आयुर्विमा पॉलिसीवरचा बोनस (दिलीप बार्शीकर)

दिलीप बार्शीकर
सोमवार, 9 जुलै 2018

आयुर्विमा पॉलिसींसंदर्भात ‘बोनस’ हा शब्द आपण नेहमी ऐकतो. हा बोनस नक्की कशासाठी दिला जातो, त्याची आकडेमोड कशा प्रकारे केली जाते, कोणत्या प्रकारच्या पॉलिसींवर बोनस मिळतो आदी गोष्टींची माहिती.

आपण बॅंकेत किंवा पोस्टात ठेवलेल्या ठेवींवर आपल्याला व्याजाच्या रूपात परतावा मिळतो, शेअर्समधल्या गुंतवणुकीवर लाभांश मिळू शकतो. त्याचप्रमाणं आयुर्विमा पॉलिसीतल्या गुंतवणुकीवर आपल्याला बोनसच्या रूपात परतावा मिळतो. आज या बोनसविषयी थोडीशी माहिती घेऊ या. 

बोनसपात्र पॉलिसी
सरसकट सर्व पॉलिसींवर बोनस देय होत नाही. ज्या पॉलिसी दस्तावेजावर ‘नफ्यासहित’ (विथ प्रॉफिट) असं नमूद केलेलं असतं अशाच पॉलिसी   बोनससाठी पात्र ठरतात. सर्वसामान्यपणे एंडॉमेंट, मनी बॅक, होल लाइफ या वर्गातल्या पॉलिसींना बोनस मिळू शकतो. टर्म इन्शुरन्समध्ये फक्त जोखीम संरक्षणासाठी लागणारा अत्यल्प प्रीमियम आकारलेला असतो. त्यामुळं अशा पॉलिसींवर बोनस देण्याचा प्रश्नच येत नाही. युलिप्समध्ये विमाधारकानं दिलेला प्रीमियम त्याच्याच पसंतीच्या फंडात गुंतवला जातो. यातून होणारं नफा/नुकसान सर्वस्वी विमाधारकाचंच असते. त्यामुळे त्याला पुन्हा नफ्यात वाटा (बोनस) देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे पॉलिसी घेतानाच विमाधारकानं बोनस पात्रतेविषयी माहिती करून घ्यावी. म्हणजे भविष्यातील संभाव्य गैरसमज टळू शकतील.

बोनस केव्हा, कसा जाहीर केला जातो?
विमा कायद्यानुसार प्रत्येक विमा कंपनीनं दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरीस ‘गणिती मूल्यांकन’ (actuarial valuation) करून घेणं बंधनकारक आहे. विम्याचं गणित अनेक गृहीतांवर आधारित असते. पॉलिसीच्या कालावधीत किती विमाधारकांचा मृत्यू होऊ शकेल, प्रीमियमच्या रूपानं मिळालेली रक्कम गुंतवल्यावर कोणत्या दरानं, किती व्याज मिळू शकेल, विमा व्यवस्थापनासाठी किती खर्च होऊ शकेल अशा गोष्टींचे अंदाज कंपनीनं बांधलेले असतात. या अंदाजी आकड्यांचा किंवा गृहीतांचा प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवाशी कितपत ताळमेळ बसतो हे मूल्यांकनाद्वारे तपासून पाहिलं जातं. प्रत्यक्ष अनुभव हा अनुकूल असेल (उदाहरणार्थ, अंदाजापेक्षा प्रत्यक्षात कमी मृत्यू झाले किंवा गुंतवणुकीवर अंदाजापेक्षा अधिक व्याज मिळालं वगैरे), तर कंपनीला ‘नफा’ होईल. विम्याच्या भाषेत त्याला ‘सरप्लस’ म्हणतात. (विम्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून उत्पन्न- खर्च= नफा असं सरळसोट समीकरण इथं मांडता येत नाही.) या सरप्लसमधून आवश्‍यक, तर काही रक्कम राखीव म्हणून बाजूला काढून सरप्लस उघड केला जातो आणि यातली किमान नव्वद टक्के रक्कम विमाधारकांना बोनस म्हणून वाटण्यात येते. थोडक्‍यात, आर्थिक वर्षाअखेरीस मूल्यांकनानंतर बोनसचे दर जाहीर केले जातात. एंडॉमेंट, मनी बॅक, होल लाइफ अशा वेगवेगळ्या वर्गातल्या पॉलिसींचे बोनस दरही वेगवेगळे असतात.

बोनस रक्कम कधी मिळते?
बोनस जाहीर झाला, की तो विमाधारकाच्या पॉलिसीवर जमा होतो; पण तो त्याला मुदतपूर्ती, मृत्यूदावा किंवा सरेंडर अशा वेळी अंतिम विमा रकमेबरोबरच मिळतो. या वार्षिक बोनसशिवाय दीर्घ मुदतीच्या पॉलिसीवर (साधारण १५ वर्षं किंवा अधिक काळ पॉलिसी चालू अवस्थेत असेल तर) एक जादा एकरकमी बोनस मुदतपूर्ती किंवा मृत्यू दाव्याच्या वेळी दिला जाऊ शकतो, ज्याला ‘अंतिम अतिरिक्त बोनस’ (फायनल ॲडिशनल बोनस) म्हणतात.

एक छोटंसं उदाहरण पाहू. नारायणरावांनी एंडॉमेंट प्रकारातली वीस वर्षं मुदतीची, एक लाख विमारकमेची पॉलिसी घेतलेली आहे. समजा, पहिल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीनं दर हजारी विमारकमेवर चाळीस रुपये असा बोनस दर जाहीर केला. (इथं एक गोष्ट लक्षात घ्या, बोनस दर हा विमारकमेवर जाहीर केला जातो, भरलेल्या प्रीमियमच्या रकमेवर नव्हे). आता नारायणरावांच्या खात्यावर चार हजार रुपये इतका बोनस जमा होईल. दुसऱ्या वर्षी बोनस दर पन्नास रुपये असेल, तर पाच हजार रुपये इतका बोनस दुसऱ्या वर्षी जमा होईल. समजा, मुदतपूर्तीपर्यंत अशा प्रकारे जाहीर झालेल्या वीस वर्षांच्या बोनसची एकूण रक्कम एक लाख वीस हजार रुपये इतकी येत असेल, तर नारायणरावाना मूळ विमारक्कम एक लाख रुपये, अधिक बोनस एक लाख वीस हजार रुपये अशी एकूण दोन लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम मुदतपूर्तीचा क्‍लेम म्हणून मिळेल. यात समजा कंपनीनं वीस हजार रुपये एवढा अंतिम अतिरिक्त बोनस जाहीर केला असेल, तर हीच क्‍लेमची रक्कम वाढून दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी होईल. समजा, संबंधित विमाधारकाचा पॉलिसी घेतल्यापासून सात वर्षांनी मृत्यू झाला, तर विमाधारकाला मूळ विमारक्कम एक लाख रुपये, अधिक सात वर्षांचा बोनस इतकी रक्कम मृत्यूदावा म्हणून मिळेल.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोनससाठी पात्र होण्यासाठी नियमितपणे प्रीमियम भरून पॉलिसी चालू स्थितीत ठेवणं आवश्‍यक आहे. प्रीमियम भरला नाही, तर पॉलिसी बंद स्थितीत जाऊन विमारकमेचं नुकसान होतंच; पण बोनस जमा होणंही बंद होतं, हे लक्षात ठेवावं.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: What is Bonus for Life insurance policy