World Water Day 2021: पाणी... जरा जपूनच वापरा!

World_Water_Day
World_Water_Day

World Water Day 2021: ग्रीक तत्ववेत्ता थेलीस म्हणतो, "सगळं पाण्यातून येते आणि पुन्हा पाण्याशीच एकरूप होवून जाते.'' माणसाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या सर्व उपभोग्य वस्तूंची निर्मिती जलस्त्रोतांवर अवलंबून असते. तर उपभोगातून निर्माण होणारे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचे कामदेखील पाण्यालाच करावे लागते. म्हणूनच या सृष्टीचक्राचा समतोल राखून मानवी जीवनाचा मूलभूत पाया ढासळणार नाही यासाठी पाण्याचे महत्व आपण सर्वांनी गंभीरपणे विचारात घेणे आवश्‍यक आहे. यंदाच्या जलदिनाची मध्यवर्ती विषय संकल्पना आहे, "पाण्याचे मोल म्हणजेच पाण्याला मोल देणे.''

थोडक्‍यात, "व्हॅल्युईंग वॉटर' असे आहे. पाणी आणि हवामानातील बदल यांचा परस्पर संबंध आहे. पाण्यामुळे होणारे हवामानातील बदल जाणून घेऊन या बदलांविरुद्ध लढण्यासाठी पाण्याची मदत होऊ शकते. समाजाला पाण्याचे महत्त्व पटविणे आणि पाणीविषयक समस्या सोडवण्यात सहभागी करून घेणे हा जागतिक जलदिनाचा मुख्य उद्देश आहे.

पाणी हेच जीवन
पाणी हा पर्यावरणातील प्रमुख घटक असून पाण्यामुळेच पर्यावरणास अर्थ प्राप्त होतो. पाण्यामुळेच पर्यावरणातील प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू आदी बहुतांश घटकांच्या जगण्यावर, वाढीवर आणि सुस्थितीत राहण्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. मनुष्य हा पर्यावरणाचा केंद्रबिंदू मानला जातो. पाण्याच्या माध्यमातून पर्यावरणाचा विकास साधणे हे केवळ मानवाच्या हाती आहे. पाणी हे जीवन आहे. त्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी होत नाहीतर, अन्न, वस्त्र,निवारा आदी मूलभूत उपभोग्य वस्तू निर्माण करण्यासाठी होतो. आज पाण्यापासून ऊर्जा निर्मिती ही नवीन गोष्ट नाही.

पिण्यायोग्य पाण्याची कमतरता
तसे पाहता पृथ्वीवर पाण्याचा साठा पुष्कळ आहे, पण तो सर्वच मानवासाठी उपयोगी आहे असे नाही. पृथ्वीवरील पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी सागरी पाण्याच्या स्वरूपात आहे. म्हणजेच ते पाणी क्षारयुक्त आहे. केवळ दोन टक्के पाणी ध्रुव प्रदेशात बर्फ रूपात आहे, तर उरलेले जेमतेम एक टक्का पाणी नद्या, नाले, विहिरी, तलाव व भूगर्भात गोड्या पाण्याच्या रूपात आहे. याच एक टक्का पाण्यावर मानवाचे भौतिक संस्कृतीमधील सर्व चलनवलन अवलंबून आहे. या पाण्याशिवाय मानवाच्या भौतिक प्रगतीचे एकही पाऊल पुढे पडू शकत नाही. तथापि, मानवी जीवनास व प्रगतीस अत्यावश्‍यक असलेले हे पाणी झपाट्याने प्रदुषित होत आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलप्रदूषण हीच मानवासमोरची मोठी औद्योगिक व सांस्कृतिक समस्या म्हणून उभी राहिली आहे.

नासाडी, प्रदूषण रोखूया
यंदा कडक उन्हाळ्यामुळे राज्यापुढे पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्‍यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे, पाणीपुरवठा योजनेतील पाईप फुटून अथवा नळगळतीने होणारी नासाडी थांबविणे गरजेचे आहे. तलाव, विहीर, नद्या इत्यादी पाण्यांच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखणे, पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचे वार्षिक नियोजन, पाणी वापराशी संबंधित कायदे, नियम याबद्दल जनजागृती तसेच शहरी भागात घरगुती पाणी वापरात बचतीचे उपाय आदी उपक्रमाला जर कृतिशिलतेची जोड दिली तर ते अधिक प्रभावी होईल.

जलसाक्षरतेतून संवर्धन
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 रोजी पहिला "जागतिक जल दिन' साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे. उदा. गेल्या वर्षीची, म्हणजे 2020ची संकल्पना होती, "पाणी आणि हवामान बदल', कारण हवामानातील बदलांविरूद्ध लढण्यासाठी पाण्याची मदत होऊ शकते. जलदिनाच्या निमित्ताने सर्वांनी जलसाक्षर होऊन जल संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कारण "जल है तो कल है.'

गरजेएवढेच पाणी वापरा!
स्वत:ला नेमकी किती पाण्याची गरज आहे, हे ओळखून तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे. याच भुमिकेचा अंगीकार करून तिचा प्रसार केला तरी बरेच काही साध्य होवू शकते. तज्ञांच्या मते, जर तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. तथापि, दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात भीषण आणि कठीण परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

- सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com