esakal | ।। उपासना ।।
sakal

बोलून बातमी शोधा

prayer, Worship

उपासना वाढवाविशी वाटू लागली, डोळे भरून येऊ लागले, कंठ दाटून येऊ लागला, शुभ स्वप्ने पडू लागली, दैवी अनुभव येऊ लागले, निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे. पुढे पुढे संसारसुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात.

।। उपासना ।।

sakal_logo
By
पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. स्वत:ही, आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तो आपला आत्यंतिक आनंद असतो.उपासनेचे कष्ट वाटू नयेत तर उपासनेची गोडी लागावी. ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड वाटू लागते. उपासनेचे फळ मिळेल, ऐहिक भरभराट होईल, दु:खे नाहीशी होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवू नयेत, कारण बरीचशी उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते. कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल! त्याचा हिशेब ‘तो’ ठेवेल.

उपासना वाढवाविशी वाटू लागली, डोळे भरून येऊ लागले, कंठ दाटून येऊ लागला, शुभ स्वप्ने पडू लागली, दैवी अनुभव येऊ लागले, निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे. पुढे पुढे संसारसुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात. व्याकूळ होऊन उपासक सात्त्विक रागाने देवाला विचारतो...

हेही वाचा: कालिदासाचा अनोखा राम...

मुका मुक्तेश्वर बोलविला। पांगुळा कूर्मदास चालविला।

आंधळा सूरदास डोळस केला।

मजविषयी तुजला काय झाले।

येथोनी आता कृपा करा।

आपली माया आपण आवरा।

ते ऐश्वर्य न रुचे आम्हा पामरा।

चरणी थारा देईजे।

अशी अवस्था उपासनेची पराकोटीची उच्च उंची दर्शविते. ती येणे उपासकाच्या व्याकूळतेवर अवलंबून असते, पूर्वकर्मांच्या ओझ्यावर अवलंबून असते. निरपेक्ष प्रेमाने प्रखर उपासना करीत राहणे हेच उत्तम. उपासना कोणत्या देवाची करावी हा प्रश्नच पडू नये. शक्ती एकच आहे. ती विद्युल्लतेसारखी आहे. वीज गिझरमधून गेली तर ती महाकालीचे रूप असते आणि एसीमधून गेली तर शांतादुर्गा असते.

आपल्याला भावेल त्या देवतेची उपासना करावी. कोणाला भगवान शंकराचा भक्तांना त्वरित फळ देण्याचा भाव आवडतो, तर कोणाला दत्तमहाराजांचे संन्यासी विरक्त रूप भावते, तर कोणाला जगदंबेची भक्तवत्सलता भावते. कोणाला मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा संयम भावतो, तर कोणाला मारुतीरायाची दास्यभक्ती भावते. म्हणून देवादेवांत भेदभाव करू नये. कोणताही खाद्यपदार्थ क्षुधाशांती करतोच तसे कोणत्याही देवतेची भक्ती आत्मतृप्ती करतेच.

उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतांसी सदा लवावे।

सत्कर्म योगे वय घालवावे। सर्वां मुखी मंगल बोलवावे।। हर हर महादेव

- ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे

हेही वाचा: आईची सृजनशीलता

loading image