esakal | जावळीतील आरोग्य विभागात 53 पदे रिक्त; अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
sakal

बोलून बातमी शोधा

Health Department

जावळीतील आरोग्य विभागात 53 पदे रिक्त; अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा) : जावळी तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच जावळी तालुका आरोग्य विभागात तब्बल 53 पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे आरोग्य विभागाच्या उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे आरोग्य विभागास जिकिरीचे झाले आहे.

जावळी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असून रुग्णांना सेवा पुरवणे आरोग्य विभागास शक्‍य होत नाही. वैद्यकीय अधिकारी ते शिपाई या विविध संवर्गातील तब्बल 53 पदे तालुक्‍याच्या आरोग्य विभागात रिक्त आहेत. ही रिक्त पदे तातडीने भरणे आवश्‍यक आहे. जावळी तालुक्‍यात केळघर, कुडाळ, कुसुंबी, सायगाव, बामणोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. खर्शी येथे आयुर्वेदिक दवाखाना असून बामणोली येथे तरंगते वैद्यकीय पथकाचा दवाखाना आहे.

प्रांताधिका-यांचा आदेश; आठ मे पर्यंत दवाखाने, मेडिकल वगळता सर्व बंद

जावळी तालुक्‍यात संवर्गनिहाय मंजूर व रिक्त पदे पुढीलप्रमाणे : वैद्यकीय अधिकारी "अ' वर्ग- मंजूर पदे- 5, रिक्त पदे- 2. समुदाय आरोग्य अधिकारी- मंजूर पदे- 23, रिक्त पदे 5. आरोग्य सहायक महिला- मंजूर पदे- 10, रिक्त पदे 1. आरोग्य सेविका मुख्यालय- मंजूर पदे 6, रिक्त पदे 2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ- मंजूर पदे 5, रिक्त पदे 1. आरोग्य सेविका उपकेंद्र- मंजूर पदे- 24, रिक्त पदे- 9. सफाई कामगार- मंजूर पदे 5, रिक्त पदे- 2. स्त्री परिचर- मंजूर पदे 5, रिक्त पदे- 4. पुरुष परिचर- मंजूर पदे 15, रिक्त पदे 12. कनिष्ठ सहायक, आरोग्य सेवक व वाहन चालकाचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. आयुर्वेदिक दवाखाना (खर्शी) व तरंगते पथक (बामणोली) येथे विविध प्रवर्गातील 9 पदे रिक्त आहेत.

'शिवभोजन' सर्वसामान्यांचा आधार; लाखाे नागरिक घेताहेत आस्वाद

प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर अंतर्गत 37 गावे येतात. या गावांची लोकसंख्या 25 हजारांवर असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांची 6 पदे मंजूर असताना 4 पदे रिक्त आहेत. सध्या कोरोनाबाधिताच्या निकट सहवासीत रुग्ण शोधणे, दैनंदिन सर्वेक्षण करणे, हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेणे, चिकुनगुणिया व डेंगी या आजारासंबंधी सर्वेक्षण, क्षयरोग, कुष्ठरोग निवारण कार्यक्रम राबवणे, साथरोग अभियान राबवणे, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करणे, दैनंदिन आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबवणे, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवणे, कोरोना लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करणे ही कामे प्रामुख्याने आरोग्य विभागास करावी लागतात. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सेवा देणे अवघड झाल्याने रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी तालुक्‍यातील जनतेतून होत आहे.

अजित पवारांच्या निर्णयाची अंमलबजावणी हाेईना : डाॅ. भारत पाटणकर

जावळी तालुक्‍यात आरोग्य विभागात रिक्त पदे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पदभरतीला राज्य शासनाने मान्यता दिली की, रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू होईल.

-डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

Edited By : Balkrishna Madhale

loading image