
सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण वृक्ष बँक तयार करणार आहोत.
ऑक्सिजन देणारी झाडेच मोठी सेलिब्रिटी: अभिनेते सयाजी शिंदे
सातारा: ऑक्सिजन देणारी ही झाडेच मोठी सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे झाडांपुढे आपण नतमस्तक असले पाहिजे. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण वृक्ष बँक तयार करणार आहोत. वृक्ष बँकेतील झाडे मोठी होतील तसतसे ते आपल्याला व्याज देत राहतील. यातून शाळांतील मुलांपर्यंत वृक्षांचे संगोपन करण्याची जाणीव पोचवणार आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा: सातारा : दरडग्रस्तांसाठीच्या घोषणा विरल्या हवेतच
येथील सदरबझारमधील हिरवाई प्रकल्पामध्ये पांडुरंग चौगुले स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात हिरवाई संस्थेच्या वतीने दिला जाणारा पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणेते सयाजी शिंदे यांना ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, कार्डिओलॉजिस्ट डॉ. सोमनाथ साबळे, हिरवाई प्रकल्पाच्या संस्थापिका संध्या चौगुले, शहर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘हिरवाई प्रकल्प प्रथम पाहिला त्याचवेळी माझ्या मनात आपणही झाडे लावावीत, असा विचार रुजला. सह्याद्री देवराई प्रकल्प हा माझ्या आवडीचा प्रकल्प आहे. हे काम करताना खूप त्रास होतो, कष्ट करावे लागतात. मात्र, पुरस्कार मला तितके महत्त्वाचे वाटत नाहीत. ऑक्सिजन देणारी झाडेच मोठी वाटतात.’’
हेही वाचा: सातारा : दिवाळीत एसटीच्या १८१ जादा बस
श्री. गोडबोले म्हणाले, ‘‘पांडुरंग चौगुले आणि संध्या चौगुले यांचे काम आम्ही गेल्या २० वर्षांपासून बघत आहोत. हिरवाई प्रकल्पाद्वारे झाडे लावण्याची चळवळ त्यांनी उभी केली आहे.’’ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात तसेच वृक्षारोपण व संगोपनात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. साबळे, धनंजय शेडबाळे, सुजित शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संध्या चौगुले यांनी प्रास्ताविक केले. तानाजी मस्के यांनी आभार मानले.
Web Title: Actor Sayaji Shinde The Tree That Gives Oxygen Is A Big Celebrity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..