कोविड : साताऱ्यात रात्रीत १९ रूग्ण वाढले, वडगांवच्या एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

जिल्ह्यातील कोविड बाधित रूग्णांची संख्या ६१८ झाली असून सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण ३३१ आहेत. आतापर्यंत २६ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून २६० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत सहा हजार ८३५ संशयितांचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे. 

सातारा : सातारा जिल्हयात कोविडची साखळी तुटेना झाली असून दररोज बाधित रूग्णांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी रात्री उशीरा १९ जणांचे अहवाल कोविडबाधित आले आहेत. कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेल्या वडगांव (ता. खटाव) येथील कोविडबाधित रुग्णाचा (वय ७५) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या रूग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा ः लढा कोरोनाशी : लाखाे लाेकांसाठी सातारा जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

जिल्ह्यातील कोविड बाधित रूग्णांची संख्या सहाशेच्या पुढे गेली आहे. दररोज रूग्ण संख्या वाढत असून यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात आलेल्यांचा समावेश आहे. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना ही कोविडची लागण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आवश्य वाचा ः म्हाते खुर्द : मित्राला वाचविताना मित्रच गाळात रूतला

काल रात्री (शुक्रवारी) उशीरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यातील होळ येथील सात व तांबवे  येथील सहा. कराड तालुकयातील तुळसण येथील पाच, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एक असे १९ जण कोविडबाधित असल्याचे समोर आले. यामध्ये तीन ते 65 वर्षे वयोगटातील अकरा पुरुष व आठ महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा ः शेतकऱ्यांना खुशखबर : जिल्हा बँकेच्या कर्ज व्याजदरात कपात

यातील एक जण बाहेरून प्रवास करुन आलेला रूग्ण असून उर्वरित १८ जण कोविडबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड बाधित रूग्णांची संख्या ६१८ झाली असून सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण ३३१ आहेत. आतापर्यंत २६ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून २६० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत सहा हजार ८३५ संशयितांचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another !9 Covid Infected Patients found Last Night In Satara district