अजित पवारांनी हस्तक्षेप करून देखील 'निवडणूक'; आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'High Voltage' लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्ञानदेव रांजणे यांनी खूप अगोदरपासून या निवडणुकीची तयारी केली होती.

Election 2021 : आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'High Voltage' लढत

केळघर (सातारा) : लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी जावळी तालुक्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara Bank Election) प्रतिनिधित्व केले. आता या मतदारसंघातून यावेळेस आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांच्यात ‘हाय होल्टेज लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. श्री. रांजणे यांनी जावळी तालुक्यातील ४९ सोसायटींच्या ठरावांपैकी ३५ हून अधिक ठराव आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, वरवर सोपी वाटत असलेली ही लढत तशी काट्याची होण्याची शक्यता आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून श्री. रांजणे यांनी खूप अगोदरपासून या निवडणुकीची तयारी केली होती. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करूनदेखील जावळी सोसायटी मतदारसंघात निवडणूक लागली. श्री. रांजणे यांनी सुरुवातीपासूनच मतांची जुळवाजुळवी करून ठेवली होती. मात्र, त्याकडे आमदार शिंदेंचे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. आताच्या या निवडणुकीचा संदर्भ हा १९९७ मध्ये झालेल्या जावळी सहकारी दूध संघाच्या निवडणुकीशीदेखील जोडला जात आहे. दूध संघाच्या निवडणुकीपासूनच जावळी तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले होते.

हेही वाचा: Tripura Violence : 'जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही'

गेले दहा वर्षे आमदार शिंदे हे जावळी तालुक्यातून जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, तालुक्यातील युवकांना बँकेत रोजगार मिळालेला नाही, अशी नाराजीची चर्चा आहे. मात्र, आमदार भोसले हे सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यात त्यांनी जावळी तालुक्याला नोकर भरतीत झुकते माप दिल्याने त्यांच्या कामकाजावर तालुक्यातील जनता खूष आहे. राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधून आमदार शिंदे ‘कपबशी’च्या चिन्हावर, तर श्री. रांजणे हे ‘चालण्याची काठी’ या चिन्हावर रिंगणात उतरलेले आहेत. या निवडणुकीमुळे ऐन थंडीच्या वातावरणात जावळी तालुक्यातील वातावरण तापले आहे. राजकीय समीकरणे जुळविण्यात माहीर असलेल्या आमदार शिंदे यांच्यापुढे श्री. रांजणे यांनी आव्हान निर्माण केले आहे. आमदार शिंदे यांना ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती; पण निवडणुकीत लढायचेच या निर्धाराने श्री. रांजणे यांनी आपला अर्ज कायम ठेवला. आमदार शिंदेंच्या मागे राष्ट्रवादीची ताकद असली तरी श्री. रांजणे यांच्याकडे असलेले सर्वाधिक ठराव याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, तसेच दीपक पवार, सुहास गिरी, अमित कदम यांचेही काही मतदार आहेत.

हेही वाचा: Election 2021 : दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात

आमदार शिंदे यांच्यासाठी जावळी मतदारसंघ सुरक्षित होता; पण यावेळेस त्यांना झुंजावे लागणार आहे. पुण्यातील बैठकीत श्री. रांजणे यांनीही आपल्याकडे सोसायटीचे ३५ ठराव असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते. त्यावरून श्री. पवार यांनीही तुमच्याकडे एवढे ठराव असतील तर तुम्ही निवडणूक लढवा, असे सांगितले होते. आमदार शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असून, श्री. रांजणे यांनी व्यवस्थित पूर्वतयारी केल्यामुळे या लढतीत रंगत आलेली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे व श्री. रांजणे एकत्र असल्याचे सांगितले जात आहे. येथे श्री. मानकुमरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची समीकरणे ठरणार आहेत. भूमिपुत्र असूनही येथे आमदार शिंदे यांचा कस लागणार आहे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेबांचं 'महानाट्य' सातारकरांनी आजही ठेवलंय जपून

loading image
go to top