शिवशाहीर बाबासाहेबांचं 'महानाट्य' सातारकरांनी आजही ठेवलंय जपून I Shivshahir Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahir Babasaheb Purandare

शिवरायांच्या जीवनावरील त्यांची निर्मिती असलेले महानाट्य पहायला मिळावे, अशी प्रत्येक माणसाची इच्छा असायची.

शिवशाहीर बाबासाहेबांचं 'महानाट्य' सातारकरांनी आजही ठेवलंय जपून

सातारा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावरील ग्रंथाने समस्त वाचकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. शिवरायांच्या जीवनावरील त्याची निर्मिती असलेले महानाट्य पहायला मिळावे, अशी प्रत्येक माणसाची इच्छा असायची. पण, सुमारे 25- 30 वर्षांपूर्वी या महानाट्याचे प्रयोग पुण्या-मुंबईत होत होते. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांच्या पुढाकाराने अभयसिंहराजे भोसले यांनी हे महानाट्य साताऱ्यात क्रांती स्मृतीच्या मैदानावर आणले होते.

शेकडो कलाकार, भव्य स्टेज, सर्वांचे ऐतिहासिक पोशाख, उडणाऱ्या तोफो, प्रत्यक्ष होणारी घोडदौड असे महानाट्य सातारकर डोक्यावर न घेतील तर नवलच. प्रारंभीच सनई चौघड्यांच्या साथीत भवानी मातेच्या प्रार्थनेवेळी भरजरी ऐतिहासिक पोशाखात रंगमंचावर बाबासाहेबांची 'एंट्री' होताच समस्त रसिकांनी असा काही टाळ्यांचा गजर केला की, सारा आसमंत टाळ्यांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषानं भरून गेला होता. बाबासाहेबही त्यावेळी सातारकरांच्या या स्वागताने भारावून गेले होते. बाबासाहेब यांचे महानाट्य सातारकरांनी हृदयात जपून ठेवलंय.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार

शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन् राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. यावेळी रूग्णालयात त्याचं नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा: 'पुरंदरे यांचे जाणे ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी' - नारायण राणे

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचं अतिव दुःख होत आहे. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत बाबासाहेबांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. या जगविख्यात इतिहासकारानं, कठोर परिश्रमानं घराघरांत शिवचरित्र पोहोचवण्यासाठी अविरत प्रयत्न केले. सातारच्या छत्रपती घराण्याशी त्यांचा वेगळाच ऋणानुबंध होता, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगत आठवणी जागवल्या आणि दु:ख व्यक्त केलं.

हेही वाचा: घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब... उदयनराजेंचे दु:ख व्यक्त

ते म्हणाले, शिवशाहीर ही पदवी, आमच्या आजी कै. राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनीच त्यांना सातारा येथे सन्मानाने बहाल केली होती. 1985 च्या दरम्यान जाणता राजा हे महानाट्य मंचकावर आणून बाबासाहेबांनी अव्दितीय कार्य केलंय. त्यांचे काळाच्या पडद्याआड जाणे मनाला चटका लावणारे आहे. बोलायला शब्दच नाहीत, इतिहास अभ्यासक्षेत्राचे तर कधीही भरुन न येणारे नुकसान त्यांच्या एक्झीटमुळे झालंय. आम्ही पुरंदरे कुटुंबीयांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं ट्विट उदयनराजे यांनी केलं आहे.

loading image
go to top