esakal | राजकीय वातावरण तापलं! तिकीट मिळवण्यासाठी उमेदवार अजितदादांना भेटणार I Ajit Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

बॅंकेच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहे.

राजकीय वातावरण तापलं! तिकीट मिळवण्यासाठी उमेदवार अजितदादांना भेटणार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) हालचाली गतिमान झाल्या असून, आता लवकरच निवडणूक कार्यक्रमही जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. तीन) दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून जाण्यास इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Nationalist Congress Party) काही आजी- माजी पदाधिकारी श्री. पवार यांची भेट घेणार आहेत. पक्षातील इच्छुकांनाच सोबत घेऊन निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी करणार आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Speaker Ramraje Naik- Nimbalkar) हे बॅंकेची निवडणूक सर्वसमावेश व बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पक्षांतर्गत वाद निर्माण होऊ नयेत, याची खबरदारी घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) पॅनेल पडू नये, यासाठीची रणनीती राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते ठरवत आहेत. जिल्हा बॅंकेत कायम तेच तेच नेते संचालक होत आहेत; पण दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचा कोणीही विचार करत नसल्याचे चित्र आहे. किमान राखीव व संस्थांच्या मतदारसंघातून तरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा काही जण धरू लागले आहेत. यामध्ये काही जुन्या जाणत्या व निष्ठावंत आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर पक्षांतील कोणाला संधी देण्याऐवजी राष्ट्रवादीतीलच इच्छुकांना संधी दिली जावी, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत निर्माण झाला आहे.

हेही वाचा: विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश; पक्षाची ताकद वाढणार

हे सर्व इच्छुक आजी- माजी पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या उद्या व परवाच्या दौऱ्यात भेट घेणार आहेत, तसेच त्यांच्यापुढे ही सर्व मांडणी करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना अजित पवार काय सूचना करणार याची उत्सुकता आहे. बॅंकेच्या काही मतदारसंघांत यापूर्वीही राष्ट्रवादीच्या इच्छुकांना स्थानिक नेत्यांनी थांबविले आहे. त्यामुळे अशा नेत्यांना अजित पवार कानपिचक्या देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावेळेस जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील आजी- माजी पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मागणीला दादा निश्चित दाद देतील, अशी आशा काही पदाधिकाऱ्यांना आहे. निवडणूक बिनविरोध करताना काही जुन्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांना जिल्हा बॅंकेत स्थान दिले जावे, अशी अपेक्षा हे पदाधिकारी श्री. पवारांपुढे करणार आहेत.

हेही वाचा: राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करत आहेत. जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांच्या क्षमतेनुसार स्थान देण्याबाबत विचार केला जाईल.

-सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सातारा

हेही वाचा: अजित पवारांनी आमच्या आज्ञेचं पालन करावं : उदयनराजे

loading image
go to top