Satara DCC Bank : कोरेगावात राष्ट्रवादीला धक्का; नाराजी फॅक्टर भोवला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank Election

आमदार शशिकांत शिंदे यांना जावळी पाठोपाठ कोरेगावातही धक्का बसला आहे.

कोरेगावात राष्ट्रवादीला धक्का; नाराजी फॅक्टर भोवला?

कोरेगाव : जिल्हा बँकेच्या कोरेगाव सोसायटी (Satara District Bank Election) मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक सहकार पॅनेलचे उमेदवार शिवाजीराव महाडिक (Shivajirao Mahadik) व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील खत्री (Sunil Khatri) यांना एकूण ९० मतांपैकी प्रत्येकी ४५, अशी समान मते मिळाल्याने श्री. खत्री यांची चिठ्ठीद्वारे निवड घोषित करण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फुटली आहेत. बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना जावळी पाठोपाठ कोरेगावातही (Koregaon Society) धक्का बसला असून, बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्यासाठीही कोरेगावचा निकाल धक्कादायक आहे.

जिल्हा बँकेच्या कोरेगाव सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अनेक जण इच्छुक होते. त्यात तालुक्याच्या दक्षिण भागातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, उत्तर भागातून बँकेचे माजी उपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, मध्य भागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष भगवानराव जाधव, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष अरुण माने, राजेंद्र भोसले यांचा समावेश होता. कोरेगावच्या उत्तर व दक्षिण भागाला यापूर्वी संधी मिळाल्याने यावेळी मध्य भागातील चौघा इच्छुकांपैकी कोणालाही बँकेसाठी संधी मिळावी, अशी मागणी या भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. तसा दबाव आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी निर्माण केला होता.

हेही वाचा: आमदार शिंदेंचा पराभव करून रांजणे भाजप आमदाराच्या भेटीला

दरम्यान, भगवानराव जाधव यांचे निधन झाले. त्यानंतरच्या घडामोडीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुनील माने यांना पुन्हा संधी देण्याची सूचना जिल्ह्यातील नेत्यांना केली होती. मात्र, अखेरच्या दिवशी शिवाजीराव महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली. ही नाराजी शमवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून नाराजांना पक्षाच्या व्यासपीठावर आणून प्रचारात सामील करून घेण्यात आले. तालुक्यात माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी कोरेगावात विशेष लक्ष घातले. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे, नितीन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. कोरेगाव सोसायटी मतदारसंघात एकूण ९० मते आहेत आणि त्यापैकी बहुतांश मते राष्ट्रवादीकडे आहेत.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

या पार्श्वभूमीवर दुसरीकडे आमदार महेश शिंदे यांनी त्यांचे समर्थक व पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील खत्री यांना रिंगणात उतरवले. श्री. खत्री यांना कोरेगाव सोसायटी मतदारसंघाची चांगली माहिती आहे. त्यातून राष्ट्रवादीतील नाराजांची मते फोडता येऊ शकतील आणि विरोधकांना शह देता येईल, असाही त्यामागचा होरा होता. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजीराव महाडिक व सुनील खत्री यांच्यात अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांची मते मोठ्या प्रमाणात फुटली आहेत. परिणामी श्री. महाडिक व श्री. खत्री यांना प्रत्येकी ४५, अशी समान मते मिळाली आहेत. त्यामुळे चिठ्ठीद्वारे श्री. खत्री यांची निवड घोषित करण्यात आली आहे.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

loading image
go to top