

Bijwadi Rain Shortage
esakal
बिजवडी : माण तालुक्याच्या उत्तर भागातील बिजवडीसह जाधववाडी,तोंडले, मोगराळे,पाचवड,राजवडी,येळेवाडी आदी गावांना यंदाच्या पावसाळ्यात पावसाने वारंवार हुलकावणी दिली आहे.तालुक्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाल्याने ओढे-नाले वाहत असताना उत्तर माणमधील या परिसरावर मात्र पावसाची कृपादृष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्यानंतर आता रब्बी हंगामाचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाअभावी परिसरातील पाणीसाठे आटत चालले असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन बागांना पाणी द्यावे लागत आहे.
यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा केली होती.मात्र पावसाने सातत्याने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत धाडसाने पेरण्या केल्या.मात्र पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने उगवलेली पिकेही पाण्याअभावी जळून गेली.त्यामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही.
दरम्यान परतीचा पाऊस सुरू होईल आणि त्यातून रब्बी हंगाम हाताला येईल या आशेवर शेतकरी होता.मात्र दररोज आकाशात ढग दाटून येतात, पावसाचे वातावरण निर्माण होते आणि काही वेळातच ढग निघून जात आहेत.तालुक्यातील इतर भागांत पाऊस होत असताना बिजवडी परिसरात मात्र पाऊस चकवा देत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाअभावी विहिरी, बोअरवेल तसेच शेततळ्यांमधील उपलब्ध पाणीसाठे कधीच संपला आहेत.त्यामुळे डाळिंबासह इतर फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना दूरवरून टँकरद्वारे विकतचे पाणी आणावे लागत आहे. फळबागांसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शेतीच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असताना आता पाण्यासाठी स्वतंत्र खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे.
शेतीच्या पाण्याबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा,पाण्याचाही प्रश्नही गंभीर झाला आहे.पाण्याबरोबरच विकतचा चाराही आणण्यासाठी शेतकऱ्यांना दाहीदिशा वणवण करावी लागत आहे.
परतीचा दमदार पाऊस झाला नाही तर रब्बीची पेरणी लांबण्याची किंवा अनेक ठिकाणी पेरणी न होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक गणितही बिघडणार आहे.त्यामुळे उत्तर माणमधील बिजवडी व परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
परतीच्या पावसावर उत्तर माणमधील शेतकऱ्यांचे आत्ताचेच नव्हे तर पुढील चार-पाच महिन्यांचे पाणी नियोजन अवलंबून आहे.एखादा-दुसरा पाऊस पडून परिस्थिती सुधारणार नाही. ओढे-नाले वाहून बंधारे, तलाव, शेततळी आणि विहिरी भरतील,असा दमदार पाऊस होणे आवश्यक आहे.त्यातून भूजलपातळी वाढून पुढील काही महिन्यांसाठी पाण्याची उपलब्धता होऊ शकते.अन्यथा पाणीटंचाई अधिक तीव्र होऊन उत्तर माणला पुन्हा भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.