भाजपची दोन वाड्यांत विभागणी; दोन्ही नेत्यांची धोरणे स्पष्ट | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपची दोन वाड्यांत विभागणी; दोन्ही नेत्यांची धोरणे स्पष्ट
भाजपची दोन वाड्यांत विभागणी; दोन्ही नेत्यांची धोरणे स्पष्ट

भाजपची दोन वाड्यांत विभागणी; दोन्ही नेत्यांची धोरणे स्पष्ट

सातारा : पालिकेची (satara carporation)आगामी निवडणूक पक्षीय नव्‍हे, तर आघाडीवरच होणार असून, त्‍याबाबतची धोरणे खासदार उदयनराजे भोसले(udainraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(shivendraraje bhosale) यांनी स्‍पष्‍ट केली आहेत. दोन्‍ही नेत्‍यांच्‍या निवडणुकीसाठीची धोरणे, भूमिका स्‍पष्‍ट असल्‍याने होणाऱ्या निवडणुकीत भाजपची (bjp)विभागणी दोन्‍ही वाड्यांत होणार हे निश्चित मानले जात आहे.

पालिकेच्‍या गत निवडणुकीत सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेची सत्ता एकहाती आपल्‍या ताब्‍यात घेतली. सत्तेच्‍या जोरावर ‘साविआ’ने सभागृहात नगर विकास आघाडीची शक्‍य तिथे आणि शक्‍य तितकी नाकाबंदी करण्‍यात यश मिळवले. सत्तेसाठीची जुळणी, बांधणी करत ‘साविआ’ची राजकीय समीकरणे सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. विकासाच्‍या मुद्‍द्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर चार महिन्‍यांपूर्वी राष्‍ट्रवादीतून लोकसभेत पोचलेल्‍या उदयनराजेंनीही खासदारकीचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला. यानंतर झालेल्‍या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हे विजयी झाले, तर पक्षांतरीत उदयनराजेंचा पराभव झाला. पराभवानंतर भाजपने उदयनराजेंचे पुनर्वसन राज्‍यसभेत करत पुन्‍हा एकदा खासदारकी बहाल केली.

दोन्‍ही नेते भाजपत असल्‍याने सातारा शहरातील भाजप ‘फुल्‍ल चार्ज’ झाली होती. यामुळे येथील प्रत्‍येक निवडणूक ते दोघे पक्षाच्‍या माध्‍यमातून लढवतील, अशी भाजपच्या कार्यकर्त्यां‍ची व स्‍थानिक पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा नंतरच्‍या काळात फोल ठरली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्तानेही दोन्ही राजांच्या कुरघोड्यांचे डाव- प्रतिडाव जिल्ह्यात चर्चेत राहिले. बिनविरोध निवड झाल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काहीच दिवसांत राष्‍ट्रीय राजकारणात पक्ष आवश्‍‍यक असला तरी स्‍थानिक पातळीवरील समतोल कायम राखण्‍यासाठी आघाडीच आवश्‍‍यक असल्‍याचे दोन्‍ही नेत्‍यांनी आपल्‍या कृतीतून भाजपच्‍या शीर्षस्‍थ नेत्‍यांना दाखवून दिले. अलीकडच्‍या काळात आघाडीचे वर्चस्‍व वाढविण्‍यासाठी दोन्‍ही नेत्यांनी प्रयत्न करत एकमेकांवर टोकाचे आरोप- प्रत्यारोप सुरू केले. नेत्यांच्या या वक्तव्यांवरून, तसेच अंतर्गत घडामोडींमुळे पालिकेची निवडणूक आघाडीवरच होणार याचे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्यानुसार दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्तेही आपली तलवार परजू लागले आहेत.

दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे मात्र, साताऱ्यातील भाजपची स्वबळाची स्वप्ने धुळीस मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे साताऱ्यातील भाजप जिवंत ठेवणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची सातारा पालिकेच्‍या निवडणुकीत दोन्‍ही नेत्‍यांत प्रत्‍येकाच्‍या सोयीसवडीनुसार विभागणी होणार हेही स्‍पष्‍ट होत आहे.

आधे इधर... आधे उधर

सातारा पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक आहेत. दोन्‍ही राजे भाजपत असल्‍याने या सहा नगरसेवकांची आणि त्‍यांच्‍या पाठीराख्‍यांची विभागणीदेखील सोयी, सवडीनुसार दोन्‍ही वाड्यांत झाल्‍याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. पक्षीय पातळीवर निवडणूक लढल्‍यास उमेदवार निश्‍चितीवेळी वरिष्‍ठांकडून अनावश्‍‍यक हस्‍तक्षेप होऊ शकतो आणि पक्षीय विचारसरणीमुळे शहरातील बांधणी ढिली होऊ शकते, या भावनेतून येत्‍या निवडणुका आघाडीवर लढण्‍याचा दोन्‍ही नेत्‍यांचा निर्णय झाल्‍याची माहिती त्‍यांच्‍या समर्थकांकडून देण्‍यात येत आहे.

तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात

सातारा शहराच्‍या विकासाच्‍या मुद्द्यावर सर्वसामान्‍य नागरिकांमध्‍ये प्रचंड नाराजी आहे. मध्‍यंतरी झालेल्‍या जिल्‍हा बँक निवडणुकीतील घडामोडींनंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा पालिकेच्‍या निवडणुकीत सक्षम पर्याय उभारण्‍याची घोषणा केली होती. घोषणेमुळे साताऱ्यातील वातावरण ढवळून निघाले असून, आमदार शिंदे यांनी निवडणुकीत ताकदीने प्रयत्न केल्‍यास काही प्रमाणात निवडणुकीचे चित्र बदलू शकते, अशा चर्चा सातारकरांमध्ये होऊ लागल्या आहेत.