
फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान देण्यास आम्ही सरकारला भाग पाडलं.
जनतेच्या मुळावर उठलेल्या आघाडी सरकारचा अंत जवळ आलाय : आमदार गोरे
बिजवडी (सातारा) : एमआयडीसीचे सीईओ असताना आपल्या भागात यांनी किती वसाहती आणल्या ते जनतेला एकदा सांगावे. इतक्या पदावर काम करताना भागातील किती जणांना नोकऱ्या लावल्या ते सांगावे. त्यामुळे भ्रष्टाचारी माजी अधिकाऱ्याने माझ्या नादाला लागू नये, अन्यथा या वयात पळता भुई थोडी होईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दिला.
धामणी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भाजप (BJP) जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अरुण गोरे, शिवाजीराव देशमुख, सोमनाथ भोसले, नितीन दोशी, हरिभाऊ जगदाळे, अतुल जाधव, धनाजी जाधव, ॲड. हांगे, गावोगावचे सरपंच, उपसरपंच, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘‘सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या आणि शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठलेल्या आघाडी सरकारचा अंत दृष्टिक्षेपात आला आहे. भाजपच जनतेच्या समस्या सोडवून सर्वांगीण विकास साधणारा पक्ष आहे. फडणवीस साहेबांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली आम्ही अधिवेशनात संघर्ष करून शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवायला आणि शेतकऱ्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यास सरकारला भाग पाडले आहे.
हेही वाचा: ..म्हणून उत्तर प्रदेश भाजपनं जिंकलं; केजरीवालांनी सांगितलं विजयाचं कारण
गेल्या १२ वर्षांत माण- खटाव मतदारसंघातील (Maan-Khatav Constituency) प्रत्येक गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आणि इथल्या मातीचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटलो आहे. उरमोडीचे पाणी आल्याने मतदारसंघाचा बराच भाग दुष्काळमुक्त झाला आहे. जिहे- कटापूरसाठी वीस मिनिटांच्या भेटीत मोदींकडून ७०० कोटींचा निधी मिळण्याची तरतूद करून घेतली आहे. येणाऱ्या पाच वर्षांनंतर या भागाला दुष्काळी म्हणण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असे काम मी करणार आहे.’’ तालुक्यातील ३२ पैकी २१ सोसायट्या आमच्या आल्या आहेत. चार दोन ठिकाणी विजय मिळाला म्हणून त्यांचा खुळखुळा नाचवत असल्याची टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा: 'भाजपच्या कट्टर समर्थकांनी मतदानाला बाहेर पडू नये, नाहीतर..'
कोरोना काळात पुण्यात लपले
कोरोना काळात आम्ही साडेतीन हजार रुग्णांवर उपचार केले. डॉक्टरही वॉर्डमध्ये जायला कचरत होते. तेव्हा जयकुमार आत जाऊन रुग्णांची विचारपूस करून धीर देत होता. कोट्यवधी खर्चून माझ्या जनतेवर मी उपचार केले. तेव्हा हे महाशय पुण्यात लपून बसले होते. त्यांना उरमोडी आणि जिहे- कटापूर माहीत नाही आणि पाणी कुठे आहे? असे विचारतात. त्यांचा ऊस मी आणलेल्या उरमोडीच्या पाण्यावर भिजतो. आता जिहे- कटापूरचे पाणी आंधळीत आणून ते उचलणार आहे. ग्रॅव्हिटीने ते वंचित ३२ गावांना देणार आहे, असे श्री. गोरे यांनी सांगितले.
Web Title: Bjp Is A Party That Will Solve The Problems Of People Jayakumar Gore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..