esakal | गोंदवलेसह चाफळात भाविकांविना रामनवमी; सलग दुसऱ्या वर्षी मंदिरात शुकशुकाट

बोलून बातमी शोधा

Ram Navami
गोंदवलेसह चाफळात भाविकांविना रामनवमी; सलग दुसऱ्या वर्षी मंदिरात शुकशुकाट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदवले : सनईचा सूर नाही... ना कीर्तन व प्रवचनाची पारायणे... परंतु श्री ब्रह्मचैतन्यांच्या श्रीरामाचा जन्मकाळ मंगलमय वातावरणात आज साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतल्याने भाविकांविना सलग दुसऱ्या वर्षी गोंदवल्यातील मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे श्रीराम भक्त होते. त्यांनी भारतात अनेक ठिकाणी राममंदिरांची स्थापना करून रामनामाचा प्रसार केला. गोंदवल्यातही त्यांनी दोन श्रीराम मंदिरांची स्थापना केली आहे. त्यामुळे श्रींच्या भक्तांप्रती येथील श्रीराम नवमी सोहळा मोठा भक्तिमय असतो. ग्रामयात्रा असणाऱ्या या सोहळ्याला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मर्यादा सांभाळूनच हा सोहळा सुरू झाला होता. यानिमित्ताने मंदिरात अखंड रामनाम सुरू होते.

आरोग्य सुविधा आमदार निधीतून देऊ; शशिकांत शिंदेंची खटावात ग्वाही

श्रीरामनावमी दिवशी आज फुलांच्या रांगोळ्या, केळीच्या बुंध्यानी आणि नारळाच्या झावळ्यांनी मंदिराची प्रवेशद्वारे नटली होती. संपूर्ण मंदिरातही पुष्पमालाची आरास करण्यात आली होती. मात्र, गर्दी टाळण्यासाठी कीर्तन, प्रवचनासह इतर कार्यक्रम या वेळी रद्द करण्यात आले. श्रीराम जन्म सोहळ्यासाठी सकाळपासून थोरले व धाकटे श्रीराम मंदिरात केवळ पुजाऱ्यांचीच लगबग सुरू होती .दुपारी बारा वाजता समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत मंदिरात श्रीराम जन्मसोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. विधिवत पूजन झाल्यानंतर साडेबारा वाजता पुष्पवृष्टी करून श्रीराम जन्मकाळ साजरा करण्यात आला. त्यानंतर न्हाणी व पाळणा झाला. भाविकांनी घरातूनच रामनवमी साजरी केली.

विक्रेत्यांनाे! एका जागी बसून भाजी विकू नका; गुन्हा दाखल हाेईल

चाफळ : तीर्थक्षेत्र चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. मंदिरामध्ये पहाटेपासून ठराविक पुजेकऱ्यांच्या उपस्थितीत श्री रामाचे भजन, आरती, स्तोत्र पठण आदी धार्मिक कार्यक्रम होऊन मंदिराच्या गाभाऱ्यात दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी भक्तांच्या उपस्थित श्रीराम जन्मोत्सव विधी पार पडला.

सध्याच्या कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे व त्यामध्ये होणारे उत्सव, यात्रांवर शासनाने बंदी आणली आहे. येथील श्रीराम जन्मोत्सव हा मंदिराच्या गाभाऱ्यात ठराविक वैदिक ब्राह्मण व श्रीराम देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक धनंजय सुतार व विश्वस्त अनिल साळुंखे, एल. एस. बाबर, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, तसेच मानकरी व महिलांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा झाला. जन्म सोहळ्यासाठी फुलांनी सजवलेल्या आकर्षक पाळण्यामध्ये श्रीरामाची मूर्ती वैदिक पूजाअर्चा करून पाच सुवासिनींच्या हस्ते श्रीरामांचे जन्म स्तोत्र पठण करून मूर्तीवर फुलांचा वर्षाव करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.

Edited By : Balkrishna Madhale