कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू : उद्धव ठाकरे

उमेश बांबरे
Saturday, 26 September 2020

आज आपण जनजागृतीद्वारे कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्ट अंतर पाळण्यावर भर दिला पाहिजे. यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी शांतपणे साजरा केला. आगामी नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सातारा : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी भूमिका बजावेल. या मोहिमेत जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही मोहीम लोकचळवळ तयार करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. 

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांचा कोंडतोय श्‍वास!

कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा, असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले, "आज आपण जनजागृतीद्वारे कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्ट अंतर पाळण्यावर भर दिला पाहिजे. यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी शांतपणे साजरा केला. आगामी नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडावा.'' 

रेशन दुकानदारांचे प्रशासनाकडे अडकले तब्बल दहा कोट रुपये!

शेखर सिंह म्हणाले, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या 16 टक्के भागाची तपासणी केली आहे. यापुढे ही मोहीम अधिक गतीने राबविली जाईल. याअंतर्गत निबंध, फोटोग्राफी स्पर्धा यासह अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे. होर्डिंगद्वारेही प्रसिद्धी केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सहा लाख 80 हजार कुटुंबांना भेटी देणार असून, यासाठी 974 पथके तयार करण्यात आली आहेत.'' 

पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड!

गावनिहाय कोरोना हॉस्पिटल उभारा : पाटील
 
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात असून, या रुग्णालयाला आणखी निधीची गरज आहे. तो निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्यावर तत्काळ गावातच तात्पुरता उपचार मिळावा, यासाठी छोटे-छोटे हॉस्पिटल सुरू करावे, म्हणजे रुग्णाची भीती कमी होईल, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray Interacted With The Officials In Satara Through Video Conference