धक्कादायक! 'रयत'च्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; जावळीत एकच खळबळ

विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे समजल्यानंतर पालक वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण परसरले होते.
Covid 19
Covid 19 Covid 19

कुडाळ (जि. सातारा) : सोनगाव (ता. जावळी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर जावळी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चक्क विद्यार्थ्यांनाच बाधा झाल्याने शाळा व्यवस्थापनासह तालुका प्रशासन व आरोग्य प्रशासनाची एकच धावपळ उडाली. कोरोनाबाधित विद्यार्थांना अद्याप तरी कोणताही त्रास उद्भवला नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक शाळा व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुंदीबाबा विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात एकूण 99 विद्यार्थी आहेत. सराव परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना शाळेत येणे भाग असल्याने विद्यार्थी शाळेत येत होते. 99 पैकी 70 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेसाठी उपस्थित होते, त्यापैकी दरे येथील काही विद्यार्थ्यांच्या पालकांना चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने व त्यांची टेस्ट पाॅझिटीव्ह आल्याचे समजल्यानंतर शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला व सायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाला तत्काळ शाऴेत तपासणीसाठी बोलावून सर्वच्या-सर्व 70 विद्यार्थ्यांची टेस्ट दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली. त्यामध्ये 11 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले.

तसेच या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत असलेल्या 5 शिक्षकांचीही तपासणी करण्यात आली. मात्र, सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोनगाव येथील शाळेत परिसराच्या गावांतील विद्यार्थी येत असल्याने दरे येथील 4, भिवडी 4 तर करंदोशी येथील 3 असे एकूण 11 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर शाळेला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले असून शाळेचा परिसर सॅनिटायझरद्वारे निर्जंतूक करण्यात आला आहे. परीक्षा सुरू असताना शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची मास्क वापरणे, सॅनिटायझर करणे, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबरोबरच थर्मामिटरद्वारे चेकिंग करणे आदी सर्व बाबींचे पालन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत होते, अशी माहिती शाळेचे लेखनिक राम शेडगे यांनी माहिती देताना सांगितले.

सर्व विद्यार्थी आरोग्य विभागाच्या देखरेखेखाली - डॉ. भगवान मोहिते

धुंदीबाबा विद्यालयातील तब्ब्ल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शाळेमध्ये वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून शाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तसेच, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही पुढील काही दिवस आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून रोजच्या रोज त्यांच्या पालकांकडून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे समजल्यानंतर पालक वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण परसरले होते. मात्र, शिक्षकांनी, तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालकांना विश्वासात घेऊन संबंधित विद्यार्थ्यांची योग्य ती निगा व काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर पालकांना दिलासा आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com