सातारा जिल्हावासियांनाे! जाणून घ्या 23 केंद्र जेथे मिळेल तुम्हाला कोरोनावरील लस

प्रवीण जाधव
Thursday, 4 March 2021

ज्या व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरणासाठी निवडलेल्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करावयाची आहे. सध्या 18 शासकीय व पाच खासगी दवाखान्यांमध्ये लसीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे. 

सातारा : जिल्ह्यातील पूर्वीचे आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना ही लस निवडलेल्या ठिकाणी घेता येणार आहे. त्यामुळे "हायरिस्क' असलेल्या नागरिकांच्या कोरोनापासूनच्या सुरक्षिततेबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. शासकीय रुग्णालयांत लस मोफत मिळणार असून, खासगी रुग्णालयांत त्यासाठी अडीचशे रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
 
कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले. तेव्हापासून नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याची प्रतीक्षा होती. लस उपलब्ध झाल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी व त्यानंतर पोलिस व शिक्षकांना प्राधान्याने ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 46 हजार 110 जणांनी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 37 हजार 533 जणांनी लशीचा पहिला डोस घेतला असून, सात हजार 806 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात कोरोनाचा कहर! जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत नववीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद
 
तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्वीचे आजार असलेल्या (हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार) व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहेत. 45 ते 59 वर्षे व 59 वर्षांपुढील नागरिक अशी ही रचना आहे. 45 ते 59 वर्षांच्या स्लॅबमध्ये केवळ पूर्वीचे आजार असलेल्यांनाच लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांना ते उपचार घेत असलेल्या डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. 59 वर्षांपुढील नागरिकांना मात्र, अशा प्रमाणपत्राची गरज नाही. या गटातील सर्व जण लस मिळण्यासाठी पात्र आहेत. 

या लशीसाठी नागरिकांना https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करून आपल्या नावाची नोंदणी करावयाची आहे. त्यामध्ये त्यांना आपल्या जवळचे लसीकरणाचे ठिकाण निवडता येते. उपलब्ध असलेल्या स्लॉटनुसार नागरिकांना लसीकरणाची दोन ते तीन दिवसांतील तारीख सध्या मिळत आहे. ज्या व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरणासाठी निवडलेल्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करावयाची आहे. सध्या 18 शासकीय व पाच खासगी दवाखान्यांमध्ये लसीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे. 

शासकीय लसीकरण केंद्रे 

जिल्ह्यातील शासकीय ठिकाणांमध्ये स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कऱ्हाड व फलटण उपजिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालय पाटण, ढेबेवाडी, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज, महाबळेश्वर व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिंचणेर वंदन, मल्हारपेठ, म्हसवड, पुसेगाव, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये फलटण, गोडोली (सातारा) व कस्तुरबा आरोग्य केंद्र (सातारा) या ठिकाणी कोविड लस मोफत देण्यात येणार आहे. 

माणच्या इतिहासात जास्त दिवस चालणारे म्हसवडात शेतकरी आंदोलन सुरूच! 

खासगी लसीकरण केंद्रे 

ओन्को लाईफ क्‍लिनिक, तामजाईनगर (सातारा), कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल व शारदा क्‍लिनिक एरम हॉस्पिटल (कऱ्हाड), मिशन हॉस्पिटल (वाई), श्रीरंग नर्सिंग होम (कोरेगाव) या ठिकाणी लस देण्याची सोय आहे. तेथे प्रती डोस अडीचशे याप्रमाणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे. भविष्यामध्ये लसीकरणाची आणखी ठिकाणे वाढविण्यात येणार आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांचे लस घेण्याचे आवाहन 

पूर्वीचे आजार व ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील त्यासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी कोरोना लस घेऊन सुरक्षित होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारकरांनाे! कोविड 19 माेफत लसीकरणासाठी पालिकेची दोन केंद्रे 

यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत 

सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद

काय सांगता! चक्क विहिरी पेट्रोल- डिझेलने भरल्या; शेतकरी चिंतेत

जाणून घ्या अर्थसंकल्पातील जनशक्तीची उपसूचना

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus vaccine centers patan karad mahableshwar koregoan satara marathi news