शशिकांत शिंदे काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आता आलीय; पराभवानंतर गर्भित इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

'मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काहीजणांनी मला मदत करण्याचा सोंग केलं, त्याचाच दगाफटका बसला.'

'शशिकांत शिंदे काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आता आलीय'

कुडाळ (सातारा) : जिल्हा बँकेची जावली सोसायटी (Jawali Society) ही निवडणूक केवळ निमित्त आहे. जिल्ह्याच्या राजकारणातून मला हद्दपार कसे करता येईल, यासाठीच या निवडणुकीत खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्यात आला. रांजणे हे केवळ सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पाठीमागे असणारी शक्ती ही वेगळी आहे. त्यामुळं माझा पराभव झाला, मी लढणारा कार्यकर्ता आहे. या निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीत सुद्धा मला पाडण्यामागं असेच षड्यंत्र झाले होते. हा माझा ठाम आरोप असून, यापुढं केवळ जावलीच नव्हे, तर सातारा तालुक्यातही मला पक्षवाढीसाठी लक्ष घालावं लागेल. आता मला राजकारणात काहीही गमवायची भीती नाही. आता फक्त शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) विचार जिल्ह्यामध्ये वाढवायचे आहेत, असे सडेतोड मत विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी हुंमगाव (ता. जावळी) येथे कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले.

बँकेच्या निकालानंतर ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, मी आजपर्यंत अनेकवेळा संयम ठेवून जिल्ह्यात काम केले. मात्र, तरीही माझ्या बाबतीत ठरवून विश्वासघात केला गेला. या पराभवाची किंमत मी नक्कीच दाखवून देणार आहे. जावळीतील प्रत्येक गावागावांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाढवून पक्ष वाढीचे काम मी आता हातात घेणार आहे. जावळी तालुक्यातील सामान्य माणसाच्या मनात दडलेला हुंकार आता बाहेर काढून संघटनेसाठी अधिक जोमानं काम करणार आहे. केवळ माझा पराभव झाला म्हणून मी हे करत नाही, तर जे लोक मला कमकुवत समजत होते त्यांना शशिकांत शिंदे काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आता आलीय. मी आजपर्यंत पक्षाच्या बंधनात होतो. मात्र, आजचा निकाल हा मला बरेच काही शिकवून गेला आहे आणि म्हणूनच मी बंधनातून पूर्ण मुक्त झालो आहे. जावळी तालुक्यातील विकासकामांच्या बाबतीत व प्रत्येक प्रश्नासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. मी जावळीत असतो, तर जावळीचा विकास अधिक उंचीवर नेऊन ठेवला असता. आजच्या पराभवाने मी बरेच काही शिकलो आहे व शहाणा झालो आहे. यापुढं जावळी तालुक्यातील सर्व निवडणुका पक्ष वाढीसाठी व लढण्यासाठी मी स्वतःला झोकून देऊन काम करणार आहे. मला आजपर्यंत जशी जावलीकरांनी साथ दिली तशीच यापुढेही द्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

हेही वाचा: रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे : शिवेंद्रराजे

राजकारण सरळ मनाने करायचे नसते, हे मला आज समजले. मी कधीही कोणाला आव्हान केले नव्हते. पंधरा वर्षानंतर सुद्धा जावळीतील जनता माझ्यावर प्रेम करते, हेच निकालावरून स्पष्ट होते. मध्यंतरीच्या काळात माझा जावलीत संपर्क कमी झाला ही माझी चूक झाली. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची मी काळजी घेतली, त्यामुळं माझ्यावर प्रेम करणाऱ्या जावळीतील जनतेपासून मी दुरावला गेलो, तरीसुद्धा जनतेने सातत्याने प्रेम केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात माझ्याकडे 32 ते 35 मतदार होते. मात्र, मुंबई येथे जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत सर्व काही मिटल्याचे दाखवले गेल्यामुळे मी गाफील राहिलो. सर्वांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला आणि तिथेच माझी चूक झाली. शरद पवार व अजित पवार यांनी माझ्यासाठी मतदानाच्या दिवशी पर्यंत लक्ष घालून प्रयत्न केले. त्यांचा मी आभारी आहे. मात्र, मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काहीजणांनी मला मदत करण्याचा सोंग केलं व त्याचाच दगाफटका बसला. या पराभवापासून मी बोध घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील काही व्यक्तींना जिल्ह्यात आपली असणारी मक्तेदारी मी मोडीत काढेल, अशी भीती होती म्हणून मला राजकारणात वाढू द्यायचं नाही. यासाठी काहींनी प्रयत्न केले.

हेही वाचा: विधानसभेनंतर शशिकांत शिंदेंचा दुसऱ्यांदा पराभव

जावळी सोसायटी ही निवडणूक केवळ निमित्त आहे. जिल्ह्याच्या राजकारणातून मला हद्दपार कसे करता येईल, यासाठीच प्रयत्न केले गेले. लढाई ही लढाई असते. मी पराभवाला कधीही घाबरलो नाही. जे कोणी मला आव्हान करत आहे, त्यांनी एकदा शशिकांत शिंदेला समोर येऊन आव्हान देऊन बघावं, मग शशिकांत शिंदे काय आहे, ते त्यांना मी दाखवून देईन. मी माझ्या पक्षाची चौकट कधीही मोडली नाही, जे माझ्या विरोधात तक्रार करत आहेत. त्यांना मीच मोठे केले आहे. खऱ्या अर्थानं आता राजकारणाला सुरुवात झालीय. मी जावली सोडून जाणार नाही. मी इथंलाच आहे. यापुढे जावळी तालुका हा कुणाचा दबाव स्वीकारणार नाही, तर दबाव झुगारणारा तालुका आहे, हे दाखवून देऊ. यापुढं जावळीतील पंचायत समिती व तहसील कार्यालयात पंधरा दिवसांतून मी स्वतः येऊन विकासकामाचा आढावा घेणार आहे. कोणीही चिंता करू नका, मी उद्यापासूनच या कामासाठी सज्ज झालो आहे, असा विश्वास ही त्यांनी यावेळी दाखवून दिला.

हेही वाचा: 'आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं दु:ख; राजकीय समिकरणं बदलणार'

loading image
go to top