esakal | साताऱ्यातील पश्‍चिम घाटात नव्या प्रजातींचा शोध; ठोसेघरात शोधले दोन नवे 'चतुर'

बोलून बातमी शोधा

New Species
साताऱ्यातील पश्‍चिम घाटात नव्या प्रजातींचा शोध; ठोसेघरात शोधले दोन नवे 'चतुर'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम घाट प्रदेश हा नेहमीच जैवविविधतेचे माहेरघर राहिला आहे. येथीलच ठोसेघर-चाळकेवाडी व कास परिसरातून साताऱ्यातील संशोधकांना चतुर (सुई) 'डॅमसेलफ्लाय'च्या दोन नवीन प्रजातींचा शोध करण्यात यश मिळाले आहे. साताऱ्यातील कीटक, फुलपाखरू अभ्यासक डॉ. श्रीराम भाकरे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार व सुनील भोईटे या तीन संशोधकांनी त्रिवेंद्रम (केरळ) येथील डॉ. कलेश सदाशिवन आणि विनयन नायर यांच्या सहकार्याने हे यश मिळवले आहे.

'युफाईया' वर्गांतील (Genus) या दोन नव्या प्रजाती आता "युफाईया ठोसेघरेन्सिस' व "युफाईया स्युडोडिस्पार' या नावाने ओळखल्या जातील. यासंबंधीचा शोधनिबंध नुकताच भारतातील नामांकित शोधपत्रिका "जर्नल ऑफ थ्रेटंड टाक्‍सा'च्या 26 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. पश्‍चिम घाटात यापूर्वी नोंद झालेल्या तीन प्रजातींमध्ये या दोन नव्या प्रजातींची आता भर पडलेली आहे. या सर्व पाचही प्रजाती जगभरात भारतातील पश्‍चिम घाट क्षेत्रातच आढळून येतात. त्या प्रदेशानिष्ठ (Endemic) आहेत. या प्रकारातील पूर्वी नोंद झालेल्या 'युफाईया फ्रेझरी' ही सामान्यतः महाराष्ट्र ते कन्याकुमारी या परिसरात समुद्रसपाटीपासून अगदी 100 ते 1200 मीटरपर्यंत सर्वत्र आढळणारी 'युफाईया डिस्पार' ही पश्‍चिम घाटाच्या पालघाट गॅपच्या उत्तरेच्या फक्त दक्षिण कॅनरा- कुर्ग ते निलगिरी या मर्यादित प्रदेशात 1066 ते 1828 मीटर उंचीवरच आढळते, तर 'युफाईया' या कार्डिनालीस पालघाट गॅपच्या दक्षिणेस 900 मीटर उंचीच्या वरील मात्र अन्नामलाई, पलनी, अगस्त्यामलाई पर्वतीय प्रदेशातच आढळणारी आहे.

'मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांची देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे'

'युफाईया ठोसेघरेन्सिस' व 'युफाईया स्युडोडिस्पार' या नव्याने नोंद करण्यात आलेल्या दोन प्रजातीदेखील उत्तर पश्‍चिम घाट क्षेत्रात फक्त ठोसेघर, चाळकेवाडी व कास परिसरातच आढळून येतात. किंबहुना त्या प्रदेशानिष्ठ आहेत. "युफाईया स्युडोडिस्पार' ही "युफाईया डिस्पार' प्रजातीपेक्षा वेगळी; परंतु साधर्म्य राखणारी आहे. मात्र, "युफाईया ठोसेघरेन्सिस' ही प्रजाती एकदमच वेगळी व नवीन, तसेच फक्त आणि फक्त ठोसेघर- कास परिसरातच आढळणारी असल्यामुळे तेथील निसर्ग, जैवविविधतेचे प्रतीक म्हणून प्रजातीस ठोसेघरचे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रजातींच्या शोधामुळे पश्‍चिम घाटातील जैवविविधता व त्याचे संवर्धनमूल्य पुनश्‍च एकदा अधोरेखित झाले आहे.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

"टोरंट डार्ट' या सामान्य नावाने ओळखले जाणारे हे "डॅमसेलफ्लाय' या प्रकारातील कीटक असून, स्थानिक मराठी भाषेमध्ये त्यास "सुई' किंवा "चतुर' असे संबोधले जाते. नदी, नाले, ओहोळ, जलाशय अशा विविध पाणथळ जागी त्यांचा वावर दिसून येतो. त्यांच्या जैव शृंखलेमधील प्राथमिक अवस्था या पाण्यामध्ये पूर्ण होतात व त्यानंतर ते पंख फुटून पाण्याबाहेर उडू लागतात. वातावरणाप्रती हे अत्यंत संवेदनशील जीव असून, त्यामुळेच त्यास आदर्श परिसंस्थेचे निर्देशकदेखील मानले जाते. सातारा व त्रिवेंद्रम येथील संशोधकांना याकामी तमिळनाडू ओडोनाटा रिसर्च ग्रुप व ड्रोंगो या संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'

ठोसेघर, चाळकेवाडी, कास परिसराचे निसर्ग, पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका प्रजातीस "ठोसेघरेन्सिस' हे नाव दिले आहे.

-डॉ. श्रीराम भाकरे, नेत्रतज्ज्ञ, सातारा

Edited By : Balkrishna Madhale