
Satara ; डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली
तांबवे: तांबवे खोरे पाटण तालुक्यातील ढेबेवाडीला जोडणाऱ्या कोळेवाडी- तांबवे मार्गावरील डेळेवाडी खिंडीतील दरड मुसळधार पावसाने आज कोसळली. त्यामुळे तो मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, वाहनधारकांची गैरसोय सुरू आहे. प्रशासनाने तत्काळ ती दरड हटवावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.
माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून ढेबेवाडी, उंडाळे खोरे तांबवे खोऱ्याशी जोडण्यासाठी हा कोळेवाडी ते तांबवे मार्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे लोकांची, वाहनधारकांची चांगली सोयही झाली आहे. कित्येक किलोमीटरचे अंतर वाचून लोकांचा वेळ व पैसेही वाचण्यास मदत झाली आहे.
या मार्गावरून कऱ्हाड- ढेबेवाडी या मार्गावरील कोळे, कुसूर, तळमावले यासह उंडाळे भागातील अनेक गावांतील लोक डेळेवाडी खिंडीचा वाहतुकीस वापर करतात; परंतु या खिंडीत दरड कोसळली आहे. पूर्ण रस्त्यावर माती, दगड पसरलेले आहेत. आज पहाटे दरड कोसळल्याने या खिंडीतून कामावर, तसेच ये- जा करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. त्याचबरोबर त्या परिसरातील विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाली आहे. त्यांना सध्या दहा ते पंधरा किलोमीटरचा वळसा घालून आपल्या गावी जाण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात तेथील दरड अनेकदा कोसळते. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते. प्रशासनाने तत्काळ संबंधित ठिकाणची दखल घेऊन ती दरड हटवावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.
Web Title: Due To Landslide Major Inconvenience Demanded Immediate Removal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..