
सातारा: चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक अन् विघ्नहर्ता रूपाने सकारात्मकता घेऊन येणाऱ्या गणरायाच्या आगमनाने आज शहरासह जिल्हाभरात सर्वांनीच ‘आनंदवर्षा’चा अनुभव घेतला. सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, राजपथ, पोवई नाका या परिसरात ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा व ‘मोरया मोरया’च्या जयघोषात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. शहरातील विविध भागांतही घरगुती गणरायाची प्राणप्रतिष्ठा उत्साहात झाली. वरुणराजाने विश्रांती घेतल्याने उदंड उत्साह आणि आनंदात गणेशाला दिमाखदारपणे विराजमान करताना सुखकर्ता- दु:खहर्ताचा गजर होत सर्वत्रच वातावरण भक्तिमय झाले होते.