esakal | चिंताजनक! साताऱ्यात सहा तालुके कोरोनाच्या विळख्यात; जिल्ह्यात अनेक गावं 'हॉटस्पॉट'

बोलून बातमी शोधा

Hotspot Center
चिंताजनक! साताऱ्यात सहा तालुके कोरोनाच्या विळख्यात; जिल्ह्यात अनेक गावं 'हॉटस्पॉट'
sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू व बाधितांच्या संख्येचा विस्फोट झालेला आहे. जिल्ह्यात मागील 15 दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेतला असता शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक 238 तर, तालुकानिहाय आढावा घेता सातारा तालुक्‍यात सर्वाधिक 606 रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबर जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, खटाव, फलटण, कऱ्हाड हे सहा तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून, प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फैलाव झाल्यापासून जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या एक हजार 543 दोन दिवसांपूर्वी आढळली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी प्रमाणात होती. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या आणि मृत्यूचेही प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासन आणि नागरिकांच्या संवादातून अनेक गावांमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आले आहेत. काही गावांमध्ये येणारे रस्ते बंद केल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी 23 रुग्ण, पुसेगाव 13, वाठार स्टेशन 20, लोणंद 16, मलकापूर 15, पाचगणी 15 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासन यंत्रणा सरसावली आहे.

हेही वाचा: सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या 15 दिवसांत 75 हून अधिक हॉटस्पॉट गावांत बाधितांची झपाट्याने वाढ होत आहे. या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य अधिकारी सतर्क आहेत. याचबरोबर सातारा शहरातही बाधितांची संख्या वाढत असून, हॉटस्पॉट असलेल्या परिसरात आरोग्य यंत्रणा विशेष खबरदारी घेत आहे. नागरिकांनीही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनास सहकार्य करून नियमांची अंमलबजावणी करण्याची आवश्‍यकता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.

हेही वाचा: लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा; गृहराज्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

बावधन आरोग्य केंद्रात एका दिवशी 31 रुग्ण

यात्राबंदी असतानाही प्रशासनाचे आदेश झुगारून बावधन व परिसरातील नागरिकांनी बगाड यात्रा काढली होती. त्याचे परिणाम सद्य:स्थितीत दिसून येत आहेत. बावधन प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी 31 बाधित रुग्ण आढळले असून, आतापर्यंत 116 बाधितांची नोंद झाली आहे.

हेही वाचा: गाेलमाल है भाई सब गाेलमाल है; Covid19 साता-याचा डॅशबाेर्ड सुधारा

गेल्या 15 दिवसांतील तालुकानिहाय बाधित रुग्ण

 • सातारा : 606

 • खटाव : 531

 • खंडाळा : 557

 • कोरेगाव : 479

 • फलटण : 495

 • कऱ्हाड : 385

 • महाबळेश्‍वर : 318

 • वाई : 247

 • माण : 175

 • जावळी : 113

 • पाटण : 57

Edited By : Balkrishna Madhale