
'महाराष्ट्रात काँग्रेस संघटना वाढीसाठी यापुढं मंत्री प्रयत्न करणार आहेत.'
'ती' बाब योग्य नाही, लवकरच शरद पवारांशी बोलणार : नाना पटोले
सातारा : डिजिटल सभासद नोंदणीमुळे गावागावांत व खेड्यातील काँग्रेसचा (Congress) कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी आता प्रत्येक महिन्याला काँग्रेसचा एक मंत्री येऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.
श्री. पटोले हे कोल्हापूरवरून मुंबईला जाताना काल येथे थांबले होते. त्यांच्यासोबत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. पटोले यांनी डिजिटल सभासद नोंदणीबाबत उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले,‘‘ डिजिटल सभासद नोंदणी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत गेल्यामुळे पुन्हा एकदा प्रत्येक गावातील गल्लीतील, मोहल्ल्यातील नागरिक काँग्रेसचे सभासद झाले. त्यामुळे गावागावांत, खेड्यात काँग्रेस मजबूत होण्यास मदत होईल. सातारा जिल्ह्याने डिजिटल सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर करावी. महाराष्ट्रात काँग्रेस संघटना वाढीसाठी यापुढे सातारा जिल्ह्यात व तालुक्यात प्रत्येक महिन्याला काँग्रेसचे मंत्री येऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहेत.’’
हेही वाचा: भगवा घालणाऱ्यांनो तुम्ही दहशतवादीच बना; पुलकित महाराजांचं वादग्रस्त विधान
डॉ. सुरेश जाधव यांनी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) व संपर्कमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचे काम सुरू असून, डिजिटल सभासद नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत जाऊन आढावा बैठक घेण्यात आल्या आहेत, असे सांगितले. जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. विजयराव कणसे व विराज शिंदे यांनी किसन वीर साखर कारखाना बंद असल्यामुळे वाई व कोरेगाव तालुक्यांतील ऊस तसाच पडून आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उसाची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अडवणूक होत आहे, असे निदर्शनास आणून दिले. याबाबत पटोले यांनी ही बाब योग्य नसून मी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी लवकरच बोलणार असल्याचे सांगितले. यावेळी उदयसिंहदादा पाटील, विराज शिंदे, रजनीताई पवार, धनश्री महाडिक, रजिया शेख, मनीषा पाटील, अमोल शिंदे, अभय कारंडे, अरबाज शेख, संभाजी उत्तेकर आदी उपस्थित होते. नरेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. मनोजकुमार तपासे यांनी आभार मानले.
हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
Web Title: I Will Talk To Sharad Pawar About Sugarcane Nana Patole
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..