esakal | स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी हॉटेलवाल्यांचा 'नियमबाह्य' रस्ता; कऱ्हाडात अजब फंडा

बोलून बातमी शोधा

Illegal Hotel

स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी हॉटेलवाल्यांचा 'नियमबाह्य' रस्ता; कऱ्हाडात अजब फंडा

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (सातारा) : कऱ्हाड-उंब्रज महामार्गावर सेवारस्त्यानजीक असलेले विविध हॉटेल्स, ढाबे, लॉजिंग परिसरात व्यावसायिकांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी बनविलेले नियमबाह्य रस्तेजोड वारंवार अपघातास निमंत्रण देत आहेत. प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधितांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अपघात टाळण्यासाठी येथे ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

कऱ्हाड-उंब्रज मार्गावर सेवा रस्त्यानजीक दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, ढाबे आणि लॉजिंगची संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस त्यात वाढच होत चालली आहे. वारुंजी फाटा, गोटे, मुंढे, खोडशी, वनवासमाची, बेलवडे हवेली, तळबीड, तासवडे, वराडे, शिवडे, कोर्टी आदी ठिकाणच्या हॉटेल संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. मात्र, हे व्यावसायिक हा व्यवसाय थाटत असताना प्रशासनाच्या नियम व अटींना पुरती बगल देत आहेत. हॉटेलसह ढाबे व्यावसायिक हे व्यवसाय थाटताना पार्किंगसाठी पुरेशी जागा सोडत नाहीत, उलट सेवारस्त्यावरच नियमबाह्यरित्या वाहने पार्किंग करतात. अनेक ठिकाणी महामार्ग आणि सेवारस्ता यामध्ये व्यावसायिकांनी नियमबाह्यरित्या रस्तेजोड तयार केले असून, ते नियमबाह्य रस्तेजोड सध्या अपघातास निमंत्रण देताना दिसत आहेत.

मोदींच्या वल्गना त्यांच्याच अंगलट; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

बेलवडे हवेली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांना कायमचे अपंगत्व पत्करावे लागले आहे. या मार्गावरील झालेल्या अनेक अपघातांमुळे येथे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाकडून काही उपाययोजना होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या सपशेल फोल ठरल्या आहेत. या मार्गावरून प्रवास करताना सध्या वाहनधारकांना, प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून कऱ्हाड-उंब्रज मार्गावरील हे नियमबाह्य रस्तेजोड त्वरित तोडून वाहनधारकांना भयमुक्त करावे, अशी वाहनधारकांची अनेक दिवसांची मागणी आहे.

आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..

गोटे, मुंढे, खोडशी, बेलवडे हवेली, तासवडे, वराडे, शिवडे, भोसलेवाडी, कोर्टी आदी हद्दीतील काही व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी महामार्गाच्या सेवारस्त्यावरच वाहने पार्किंग करताना दिसतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना आपला जीव धोक्‍यात घालून तेथून प्रवास करावा लागतो. अनेकदा संबंधित हॉटेल, ढाबे व लॉजिंग व्यावसायिकांना अन्य वाहनधारकांनी, ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली असता संबंधित व्यावसायिकांकडून संबंधितांना अरेरावीची भाषा वापरली जाते. हॉटेल, ढाबे व्यावसायिकांच्या मनमानीमुळे सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

वाह, क्या बात है! फलटणात खासदार उभारणार कोरोना सेंटर; रुग्णांना मोठा दिलासा

व्यवसायिकांकडून झाडांवरही कुऱ्हाड

वाहनधारकांना आपले हॉटेल व ढाबे सहजरित्या दिसावेत, यासाठी महामार्ग व सेवारस्ता दुभाजक परिसरातील झाडांवर व्यावसायिकांनी नियमबाह्यरित्या कुऱ्हाड चालवून रस्ताही भकास केला आहे. संबंधित प्रशासनाचे हात व तोंड ओले केले जात असल्याने संबंधित व्यावसायिकांवर कसलीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. संबंधित वरिष्ठ प्रशासनाने यावर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale