गव्यांनी पाठ सोडली अन् पावसानं धरली; शेतकऱ्यांची स्थिती ‘आगीतून फुफाट्यात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्यांनी पाठ सोडली अन् पावसानं धरली

गव्यांनी पाठ सोडली अन् पावसानं धरली

ढेबेवाडी : निदान भात कापणीनंतर तरी गव्यांच्या उपद्रवातून सुटका होईल अन् चार घास पोटात पडतील, या आशेवर असलेल्या निवी (ता. पाटण) परिसरातील शेतकऱ्यांच्या कष्टावर पावसाने पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. काल रात्री त्या परिसरात झालेल्या पावसाने शिवारात कापणी करून ठेवलेले आणि कापणीला आलेले भात पीक भिजून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: 'हा हिंदू धर्म आहे का?'; खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, केली जाळपोळ

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील दुर्गम निवी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हैराण आहे. कधी अतिवृष्टीचा फटका तर कधी गव्यांसह रानडुकरांच्या कळपांचा धुडगूस यामुळे शेती बेभरवशाची झाल्याने पडीक क्षेत्रातही मोठी वाढ होत चालली आहे. त्यातून काही शेतकरी धाडसाने शेती करत असले, तरी ऐन पीक काढणीवेळी तोंडाचा घास हिरावल्यासारखी त्यांची स्थिती होत आहे.

या खरीप हंगामातही निवी व परिसरातील शेतकऱ्यांचा संकटांशी सामना सुरूच आहे. मध्यंतरी काढणीला आलेले भात व भुईमुगाचे उभे पीक गव्यांनी फस्त केले. त्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता भाताची उरली सुरली पीककाढणीही पावसात अडकल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. याबाबत सांगताना निवीतील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती ऊर्फ बाळू पाटील व अन्य शेतकऱ्यांनी सांगितले, की भात हेच या परिसरातील प्रमुख पीक आहे. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने रोपलावणी लांबलेली होती. शेतकऱ्यांनी डोळ्यात तेल घालून शिवारात रात्रंदिवस जागता पहारा दिला, तरीही अनेक शेतकऱ्यांची शिवारे गव्यांनी फस्त केलीच.

हेही वाचा: CMO आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे भात काढणी लांबलेली होती. आता कापणी सुरू झाली अन् पावसाने पाठ धरली, त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत. काल रात्री झालेल्या पावसाने कापणी केलेले भात पीक भिजले, उभे पीकही कोलमडले. शेतात मोठ्या प्रमाणे भात झडले आहे. अनेकांच्या मळण्या आणि गंजीही भिजल्या आहेत. भिजलेले पीक उन्हात वाळवायचे झाल्यास ढगाळ वातावरणामुळे तेही शक्य होत नाही. चोहोबाजूंनी संकटात सापडल्यासारखी स्थिती झाली आहे.

loading image
go to top