
आपल्या गावाचा, देशाचा नावलौकिक उंचावला तर ही गोष्ट निश्चितपणे अभिमानास्पद असेल. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील या मुलींनी फडकाविलेला आपल्या कर्तृत्वाचा व यशाचा झेंडा अन्य विद्यार्थी, विद्यार्थिनींना व युवा पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे.
फलटण शहर (जि. सातारा) : प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी, खडतर परिश्रमाद्वारे फलटण तालुक्यातील ऋतुजा, वैष्णवी व अक्षता या तीन मुलींनी देशाच्या महिलांच्या कनिष्ठ हॉकी संघात स्थान मिळविले आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील या मुलींनी देशाचे सीमोल्लंघनही केले आहे. त्यामुळे या मुलींनी फडकविलेला कर्तृत्वाचा झेंडा इंटरनेटच्या विळख्यात अडकलेल्या सध्याच्या युवा पिढीला निश्चितपणे प्रेरणादायी आहे. मोबाईलमध्ये अडकलेली पिढी या मुलींच्या यशाच्या प्रेरणेने मैदानावर आल्यास विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करतील. दरम्यान युवा पिढीने इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडावे आणि प्रत्यक्षात मैदानात उतरुन आपली चढणघडण करावी असे आवाहन तिघींनी दिल्ली येथून ई-सकाळशी बाेलताना केले.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
फलटण तालुका म्हटले, की प्राधान्याने डोळ्यासमोर नावे येतात ती खो- खो व कुस्ती या क्रीडा प्रकारांची; परंतु आता हॉकीमध्येही फलटणचा नावलौकिक वाढत चालला आहे. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघात निवड झालेल्या ऋतुजा दादासाहेब पिसाळ (कोळकी), वैष्णवी विठ्ठल फाळके (आसू) तर अक्षता आबासाहेब ढेकळे (वाखरी) या तीनही मुली ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील आहेत; परंतु जिद्द, चिकाटी व सरावासाठी लागणारी मेहनत याद्वारे त्या आज हॉकीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या तीनही मुलींनी प्रथम तालुका व नंतर जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्याने 2011 रोजी त्यांची म्हाळुंगे- पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे त्यांची निवड झाली. तेथे प्रवेश मिळविलेल्या या मुली सध्या इयत्ता बारावीत आहेत. या कालावधीमध्ये त्यांचा कल हॉकीकडे आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सरावास सुरुवात झाली. पुणे येथील प्रशिक्षणानंतर अक्षताची निवड दिल्ली येथील राष्ट्रीय अकादमीत झाली. ती दिल्ली येथे गेली दोन वर्षे सराव करीत आहे. ऋतुजा व वैष्णवी या पुणे येथे सराव करीत आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात
क्रीडा प्रबोधिनीत निवडल्या गेल्यानंतर चपळता, काटकता, आहार, नियोजनबद्ध सराव, फिटनेस व समयसुचक निर्णय घेण्याची क्षमता आदी गुण अंगी बाणविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अर्थात यामध्ये त्यांच्या तत्कालीन प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे होते. फलटण तालुक्यातील मुलींनी भारतीय संघात स्थान निर्माण केल्याने विविध ठिकाणच्या मैदानांवर "चक दे इंडिया', चक दे फलटण चा नारा निनादू लागला आहे. शेतकरी कुटुंबातील मुलींच्या या यशाने अनेक लहान मुला- मुलींना, तसेच पालकांनाही हॉकी खेळ खुणवू लागला आहे. अगदी लहान वयापासून तालुकास्तरावरून भारतीय संघापर्यंत मजल मारणाऱ्या या मुलींचे सर्वांनाच काैतुक वाटत आहे.
भाविकांनाे! पुसेगावात तीन दिवस जमावबंदी, संचारबंदी लागू
या निमित्ताने मोबाईलमध्ये अडकलेली पिढी या मुलींच्या यशाच्या प्रेरणेने जर मैदानावर आली व त्यांना पालक, क्रीडा मार्गदर्शक यांचे योग्य मार्गदर्शन मिळून यातील आणखीन मुलांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली, आपल्या गावाचा, देशाचा नावलौकिक उंचावला तर ही गोष्ट निश्चितपणे अभिमानास्पद असेल. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील या मुलींनी फडकाविलेला आपल्या कर्तृत्वाचा व यशाचा झेंडा अन्य विद्यार्थी, विद्यार्थिनींना व युवा पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे.
Edited By : Siddharth Latkar