जावळीत शरद पवार, अजित पवारांनी स्वतः घातलं लक्ष; आमदार शिंदेंची प्रतिष्ठा पणाला, रांजणेंची कडवी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

जावली मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातल्याने आमदार शिंदेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

जावळीत शरद पवार, अजित पवारांनी स्वतः घातलं लक्ष; आमदार शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

कुडाळ (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे (Satara Bank Election) धूमशान संपूर्ण जिल्हाभर होत असतानाच, जावळी तालुका सोसायटी (Jawali Society) मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जावळी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री, तसेच विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांच्याविरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव रांजणे (NCP leader Dnyandev Ranjane) यांनी आव्हान निर्माण केल्याने ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत लक्षवेधी ठरली.

एकूण 49 मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी आज रविवार (ता. 21) रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मेढा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये प्रत्यक्ष मतदान पार पडले. यावेळी सर्वच्या-सर्व 49 मतदरांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या गटाच्या मतदारांनी पहिल्यांदा मतदान करण्यास सुरूवात केली. अंदाजे 23 मतदारांनी मतदान केल्यानंतर तब्बल अर्धा तासानंतर गेल्या दीड महिन्यांपासून सहलीवर असणारे ज्ञानदेव रांजणे यांचे सर्व समर्थक मतदार एकाच वेळी मतदार केंद्रावर पोहचले व सर्वांनी रांगेत उभे राहून एकामागून एक असे मतदान केले.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

Shashikant Shinde

Shashikant Shinde

यावेळी दोन्ही गटाच्या मिळून 49 मतदारांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केल्याने या गटासाठी शंभर टक्के मतदान झाले. यावेळी आमदार शशिंकात शिंदे, उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे, वसंतराव मानकुमरे, ऋषिकांत शिंदे , जि. प. सदस्या अर्चनाताई रांजणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

पांढर्‍या टोप्या अन् पांढरा मास्क

मतदान केंद्रावर रांजणे यांचे समर्थक मतदार आले असता, महिलांसह सगळ्या मतदारांनी डोक्यावर पांढरी टोपी व पांढरा मास्क परिधान केला होता. एकेक करून ज्ञानदेव रांजणे यांचे मतदार रांगेत उभे राहून मतदान करत होते. मतदान केंद्रावर आमदार शशिकांत शिंदे स्वत: उपस्थित असल्याने त्यांच्या नजरेला न भिडण्यासाठी व मतदार ओळखू येऊ नयेत, यासाठी ही अनोखी शक्कल केली असल्याची चर्चाही मतदान केंद्रावर यानिमित्ताने रंगली.

Jawali Society

Jawali Society

हेही वाचा: ..तर माझा नाईलाज आहे; जावळीतील राड्यानंतर आमदार शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक केंद्रावरच हमरीतुमरी

मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना अंदाजे 9 वाजण्याच्या सुमारास आमदार शिंदे यांचे मोठे बंधू ऋषिकांत शिंदे, तसेच आमदार शिंदे यांचे सुपुत्र तेजस शिंदे हे मतदान केंद्रावर उपस्थित होताच, त्यांनी शंभर मीटरच्या आत काही कार्यकर्ते उभे असल्याने त्यांच्यावर आक्षेप नोंदवला व रांजणे समर्थकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले वसंतराव मानकुमरे हे संतप्त झाले व त्यांनीही मोठ्या आवाजात प्रतिउत्तर देण्यास सुरूवात केली. यावेळी प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे व तेजस शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. एकूणच दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने भिडल्याने एकच गोंधळ उडाला व जोरदार हमरीतुमरी झाली. पोलिसांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार शशिंकात शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत करत मतदान केंद्रापासून बाहेर काढले. या प्रकारामुळे तेथील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले होते. निवडणूक केंद्रावरच हमरीतुमरी झाल्याने या निवडणुकीला काहीसे गालबोट लागले.

Jawali Society

Jawali Society

हेही वाचा: 'निवडणुकीत NCP सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील'

विजयाचे गणित व निकालाची उत्सुकता

सुरुवातीपासूनच जावळी मतदार संघ हा हाय व्होल्टेज म्हणून समजला गेल्याने या लढतीकडे व निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे, तर महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला असतानाच ज्ञानदेव रांजणी यांनीही चांगल्या मताधिक्‍याने निवडून येईन, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी आमदार शिंदे यांनी 24 मतदान फिक्स मिळाले असून विरोधी गटातही माझ्या विचारांचे 2 मतदार निश्चत असल्याचे सांगत 26 मते मिळवून विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे, तर 49 मतदारांमुळे 25 ही विजयासाठीची मॅजिक फिगर मी आधीच आोलांडली असून माझ्या बाजूने 28 मतदारांनी मतदान केले असल्याचे विश्वासही रांजणे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच दोन्ही गटाच्या विजयाच्या दावा प्रति दाव्यामुळे उद्याच्या (मंगळवार) निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांनी आपला हक्क बजावला असून त्यांची मते मतपेटीत बंद झालेली आहेत. मतदारांनी खरा कौल कोणाला दिला हे 23 तारखेला होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निकाल गुलदस्त्यात असला, तरी या निकालावर केवळ जावळी तालुक्यातील नव्हे, तरी जिल्ह्याचे राजकारणाची दिशा ठरणार आहे, हे मात्र निश्चित मानले जात आहे. जावली मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या मतदारसंघासाठी लक्ष दिले असल्याची चर्चा जिल्हाभर झाल्याने राट्रवादी पक्षासाठी व आमदार शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

हेही वाचा: PHOTO : मतदान केंद्रावर 'मतदार' पोहोचले थेट 'लक्झरी'तून..

loading image
go to top