
पुणे-बंगळूर महामार्गावरील कऱ्हाडजवळील दोन उड्डाणपुल पाडण्याच्या कामामुळे दररोजच मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्यातच दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु आहे.
SSC HSC Exam : विद्यार्थ्यांवर परीक्षेस मुकण्याची वेळ; शिक्षण विभागाचा गलथान कारभार
कऱ्हाड - पुणे-बंगळूर महामार्गावरील कऱ्हाडजवळील दोन उड्डाणपुल पाडण्याच्या कामामुळे दररोजच मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्यातच दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु आहे. मलकापुरमधील विद्यार्थ्यांचे कऱ्हाड, विद्यानगर परिसरात आणि विद्यानगर, कऱ्हाड परिसरातील विद्यार्थ्यांचे मलकापुरच्या शाळा, कॉलेजमध्ये परिक्षेसाठी नंबर आले आहेत. त्या विद्यार्थ्यांना परिक्षेस ये-जा करताना वाहतुक जामचा सामना करावा लागत आहे. आजतर वाहतुक जामची हद्दच झाल्याने विद्यार्थ्यांना धावत-पळत परिक्षेला जावे लागल्याने त्यांच्यावर परिक्षेस मुकण्याची वेळ आली होती. पुल पाडणार असल्याचे दोन महिन्यापुर्वी घोषीत करुनही शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत बघ्याचीच भूमिका घेतल्याने त्यांच्या चुकीचे परिणाम विद्यार्थ्याना भोगायला आले आहेत.
पुणे-बेंगळुरु महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील पुल पाडल्यानंतर आता मलकापूरच्या ढेबेवाडी फाट्यावरील उड्डाणपुल पाडण्याची कार्यवाही महामार्ग बांधकाम विभागाने सुरु केली आहे. त्यासाठी तो पुल बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकही वळवण्यात आल्याने आज सकाळपासुनच वाहनांच्या सुमारे सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे नोकरदार व विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. पोलिस उपाधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतुक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजीनी पाटील यांनी स्वतः तिथे धाव घेवुन वाहतुक कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतुक सुरळीत केली.
मात्र पुल पाडणार असल्याची माहिती दोन महिन्यांपुर्वी महामार्ग विभागाने दिली होती. त्यादरम्यान शिक्षण विभागाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. मलकापुरमधील काही विद्यार्थ्यांचे कऱ्हाड, विद्यानगर परिसरात आणि विद्यानगर, कऱ्हाड परिसरातील विद्यार्थ्यांचे मलकापुरच्या शाळा, कॉलेजमध्ये परिक्षेसाठी नंबर आले आहे. त्यामुळे त्यांना परिक्षेसाठी दररोज ये-जा करावी लागत आहे. त्यातच वाहतुक मोठ्या प्रमाणात जाम होत असल्याने विद्यार्थ्यांवर अक्षरशः परिक्षेस मुकण्याची वेळ येवुन ठेपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज अक्षरशः रडतच पेपरला जाण्याची वेळ आली.
तीन तासातच दिसली झलक...
मलकापूरच्या ढेबेवाडी फाट्यवरील उड्डाणपूल पाडण्यासाठी आज सकाळपासुन तो पुल वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची झलक केवळ तीनच तासात दिसुन आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक जाम झाल्याने अनेकांची अडचण झाली. शेवटी पोलिसांनात तेथील बॅरीकेट काढुन वाहतुक त्या पुलावरुन सुरु करावी लागली.
शिक्षण मंत्र्यापासून गट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत सर्वचजण निष्काळजी असुन विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत ते गंभीर नाहीत. उड्डाणपुल पाडताना शिक्षण मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना या मार्गावर पोलिस उभे करुन विद्यार्थ्यांची सोय करावी, अशी मागणी मी केली. पालकमंत्री यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिक्षेचा बोजवारा उडाला आहे. त्यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान सुरु आहे. किमान पेपर दिवशी तरी ढेबेवाडी फाट्यावरील पुल पाडण्याचे काम थांबवावे.
- अशोकराव थोरात, शिक्षण तज्ञ
मी आगाशिवनगरचा दहावीत शिकणारा विद्यार्थी असुन माझा कऱ्हाडमधील टिळक हायस्कूलच्या केंद्रावर पेपरसाठी नंबर आला आहे. ढेबेवाडी फाट्यावरील उड्डाण पुल पाडण्याचे काम सुरु असल्याने दररोज वाहतुक जाम होते. आज तर तीन तासाहुन अधिक काळ वाहतुक जाम असल्याने आमचा पेपर बुडतोय की काय अशी स्थिती झाली. त्यामुळे आम्हाला रडु कोसळले. पेपरला वेळेत न पोहचल्याने मानसीक संतुलनही बिघडले होते. किमान पेपरदिवशी तरी पुल पाडण्याचे काम थांबवावे.
- ओम ठोके, विद्यार्थी, आगाशिवनगर