esakal | लाेकांचा जीव वाचणे महत्वाचे की उद्‌घाटन; निर्णय झाला पाहिजे

बोलून बातमी शोधा

Kashil Health Center

लाेकांचा जीव वाचणे महत्वाचे की उद्‌घाटन; निर्णय झाला पाहिजे

sakal_logo
By
विकास जाधव

काशीळ (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसाला दोन हजारांवर रुग्णांची संख्या जात आहे. त्यामुळे रुग्णांना बेडची कमतरता भासत आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून बांधण्यात आलेल्या काशीळ ग्रामीण रुग्णालयाची इमारत गेल्या सहा महिन्यांपासून वापराविना पडून आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा होऊनही शासनस्तरावरील अनास्थेमुळे आजतागायत हे सेंटर सुरू न झाल्यामुळे परिसरातील रुग्णांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काशीळ येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे. या उभारणीत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक भरत माने यांनी विशेष परिश्रम घेतले. सुमारे 13 कोटी रुपये खर्च करून ही इमारत मागील वर्षी पूर्ण झाली आहे. या रुग्णालयाच्या उद्‌घाटनाअगोदरच कोरोना संसर्ग आल्याने हे रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे हे रुग्णालय सर्वांच्याच दृष्टीने फायदेशीर आहे. मागील वर्षी कोरोनाचा कहर वाढल्यावर या रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला होता. मागील वर्षीच्या जुलैमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच वैद्यकीय पथकाने पाहणीही केली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व त्यांच्या टीमने पाहणी केल्यानंतर कोविड सेंटर सुरू करण्यास गती आली होती. सेंटरच्या दृष्टीने आवश्‍यक ते बदल करत साधनसामग्रीही आणण्यात आली होती.

सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर वाढल्यामुळे साताऱ्यात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या सेंटरकडे दुर्लक्ष करत येथील बहुतांश साधनसामग्री हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यानच्या काळात या ग्रामीण रुग्णालयात खासगी कंपनीच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाल्याची चर्चाही होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने सेंटर सुरू करण्याची चर्चा थांबली. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बेड कमी पडू लागल्याने केअर सेंटर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. वैद्यकीय विभागाच्या अंदाजानुसार या इमारतीत 32 ऑक्‍सिजन बेड व 31 आयसीयू बेड बसू शकतात. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बेड कमी पडत असतानाही हे सेंटर सुरू केले जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

लसीकरणासाठी पुरेशी केंद्रे सुरु करा; खासदार उदयनराजेंचा आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव

स्टॉफची मंजुरी मिळेना...

हे सेंटर सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणारे डॉक्‍टर तसेच इतर स्टॉफला मंजुरी प्रशासनाकडून मिळत नसल्याने हे सेंटर सुरू होत नसल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. या इमारतीत सेंटर सुरू होण्यामुळे हजारो रुग्णांना उपचार मिळून प्राण वाचण्यास मदत मिळणार आहे. तरीही सेंटरबाबत शासनस्तरावर अनास्था दिसते. त्यावर जिल्ह्यातील मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. शासनाकडे स्वतःचे मनुष्यबळ नसेल तर त्यांनी इतर पर्याय शोधून हे सेंटर सुरू करून रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

'वाकुर्डे'चे पाणी जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत सोडा; माजी मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पाधिकाऱ्यांना आदेश

वादळी वाऱ्यात 20 लाखांवर नुकसान; कऱ्हाडला पिकांसह घरांची मोठी पडझड