esakal | Video पाहा : बोलक्‍या भिंतीत रमून गेली चिमुकली!
sakal

बोलून बातमी शोधा

Sangita Bobade

Video पाहा : बोलक्‍या भिंतीत रमून गेली चिमुकली!

sakal_logo
By
राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) : येथील तनिष्का समन्वयक संगीता बोबडे व त्यांची तीन वर्षीय नात वैभवी यांच्या कोरोनाच्या लॉकडाउन काळात दिवसाचा प्रारंभ बालगीते, गोष्टी व बागबगिच्यातील लुडबुडीने होतो. कोरोना काळात खेळायला ना मैत्रीण, ना शाळा त्यामुळे तिची होणारी चिडचीड लक्षात घेऊन आजीने नामी शक्कल शोधून काढली. घराच्या सर्व भिंतीचा व अंगणात विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. वैभवीच्या ज्ञानात व करमणुकीत भर पडेल, असे पाठ रंगवल्याने भिंती जणू तिच्याशी बोलू लागल्या आहेत.

कोरोनाच्या लॉकडाउन काळात आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वांच्याच आयुष्याची घडी विस्कटली आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका बसला तो लहान वयातील मुलामुलींना. खेळण्या- बागडण्याच्या वयात या मुलांवर घरातच बसून राहण्याची वेळ आल्याने व घराबाहेर का पडता येत नाही. याची जाणीव असावी इतके वयही नसल्याने ही बालमने या काळात कोमेजून जाण्याची जास्त शक्‍यता असते. त्याचा विचार करूनच संगीता बोबडे यांनी हा उपक्रम राबवला.

कार्यकर्त्याच्या हाकेनंतर नेत्याने पाेचविले रेमडेसिव्हर

नातीची खेळण्यासाठीची होणारी चिडचिड पाहून तिच्यासाठी आपण काय करू शकतो, तिला नेमके कशात गुंतवून ठेवायचे याचे नियोजन करून प्रेयस व श्रेयस अशा दोन्ही गोष्टी साधण्याचे संगीता बोबडे यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी गावातील एका चित्रकाराला बोलावून घरासमोरचे अंगण व भिंती रंगवून त्या बोलक्‍या केल्या. आजूबाजूचा परिसर रंगबेरंगी पाहून चिमुकली परी हरकून गेली. त्यानंतर ती उत्स्फूर्तपणे या चित्रात हरवून जाऊ लागली. भिंतीवरील चित्रे व अक्षरे अधिक बोलकी वाटू लागल्याने दिवसेंदिवस परीची भिंतीशी मैत्री घट्ट होऊ लागली आहे.

अत्यंत कल्पकतेने आजीने भिंतीवर वैभवीला शिकण्यास योग्य अशी चित्र रेखाटून घेतली आहेत. सप्तरंगी इंद्रधनुष्य, तारांगण, चंद्र, सूर्य, आकाशमाला आदींची चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. मराठी व इंग्रजी मुळाक्षरे, मराठी- इंग्रजी महिने, अंक, भौगोलिक माहिती, निसर्गविषयक माहिती, प्राणी- पक्ष्यांची चित्रे आकर्षकपणे रंगवून घेतली आहेत. त्यामुळे तिच्या ज्ञानात शाळेशिवाय भर पडून तिची जिज्ञासू वृत्तीही वाढू लागल्याचे दिसत आहे.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

आजी सकाळी- सकाळी अंगण, परसातील साफसफाई करते. त्या वेळी नातही त्यांच्या आजूबाजूला नुसतीच लुडबूड न करता भिंतीवर रेखाटलेली चित्रांशी ती गप्पा मारण्यात रमलेली असते.

लॉकडाउनमुळे चिमुकल्यांना ना अंगणवाडी ना मित्रमैत्रिणी. मोठ्यांच्या मानाने लहानांना हा बदल सहजासहजी पचनी पडलेला दिसत नाही. म्हणून या काळात थोडा वेळ आपली कामे बाजूला सारून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- संगीता बोबडे, खटाव

loading image