'महाविकास'चा कस लागणार, कामाला लागा; रामराजेंचा पदवीधर,शिक्षक निवडणुकीत ताकद दाखविण्याचा चंग

प्रवीण जाधव
Monday, 16 November 2020

दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीतजास्त मतदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विचारांना साथ देऊन पदवीधर व शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन बहुतांश नेत्यांनी केले.

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. या निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेणार आहे. सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.
 
पुणे पदवीधर विधानसभा व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, "पदवीधर'चे उमेदवार अरुण लाड, जयंत आजगावकर, उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, राजेंद्र शेलार, ऍड. दत्तात्रय धनावडे उपस्थित होते.

अखेरपर्यंत ब्रिटिश सरकारच्या हाती किसन वीर लागले नाहीत; आबासाहेब वीर पुरस्कार स्विकारताना गणपतराव देशमुखांनी सांगितला किस्सा

दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीतजास्त मतदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विचारांना साथ देऊन पदवीधर व शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादी संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे. आपल्याच काही लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले पाहिजेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

मतदार नोंदणी चांगली झाली आहे. मतदारांना आपल्याकडे आणण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. पालकत्व बाळसाहेब पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला विजय खेचून आणायचा आहे, असे शंभूराज देसाई यांनी नमूद केले. 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये मतदान बाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्वांना कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. मायक्रोप्लॅनिंग करा. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी पार पाडा. ताकदीने लढावे लागेल. भाजपला आपली ताकद दाखवायची आहे. एकत्र आलो की चमत्कार घडतो हे त्यांना दाखवून देऊ, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी घटनेचा आदर करावा : पृथ्वीराज चव्हाण 

विजय आपलाच आहे, तरीही झगडावे लागणार आहे. मायक्रोप्लॅनिंग करावे लागेल. वेळ कमी आहे म्हणून शांत बसून चालणार नाही, असे मत अरुण लाड यांनी व्यक्त केले. नोंदणी झालेल्या प्रत्येकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया, असे जयंत आजगावकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi Meeting For Pune Graduate Constituency Candidate Arun Lad Satara News