स्वाक्षऱ्या न करताच नगराध्यक्षा पायउतार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 sign
स्वाक्षऱ्या न करताच नगराध्यक्षा पायउतार!

स्वाक्षऱ्या न करताच नगराध्यक्षा पायउतार!

कऱ्हाड : पालिकेची मुदत डिसेंबरला संपली. त्यानंतरही पालिकेच्या १५० हून अधिक ठरावांवर स्वाक्षऱ्या नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठराव कोणता घ्यायचा, कोणी वाचायचा, तसेच स्वाक्षऱ्यांवरून पालिकेत पाच वर्षे राजकारण झाले. ते अखेरपर्यंत कायम राहिल्यानेच पालिकेची मुदत संपल्यानंतरही १४७ हून अधिक ठराव स्वाक्षरीविनाच आहेत. पालिकेच्या शेवटच्या सभेच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष जयवंत पाटील होते, त्याही सभेतील एकाही विषयावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने तेही विषय लटकले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदेंसह उपाध्यक्ष पाटील १४७ ठरावांवर स्वाक्षऱ्या न करताच पायउतार झाले आहेत. त्यामुळे त्या ठरावांच्या मंजुरीला अडथळ्यांची शर्यतच करावी लागणार आहे. (Satara news)

हेही वाचा: महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

पालिकेच्या २०१६ ते २०२१ पर्यंतच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची अखेरची मुदत डिसेंबरला संपली. पाच वर्षे सत्ताधारी कोण व विरोधक कोण हेच कळाले नाही. परिणामी ठरावांची मंजुरी, त्यावरील स्वाक्षरीवरून गाजलेले राजकारण अखेरपर्यंत कायम राहिल्याने त्यांच्यातील वाद तसाच राहिला. पालिकेच्या पाच वर्षांत ठरावावरील स्वाक्षरी, मंजुरीला झालेली दिरंगाई, त्यावरून आरोप- प्रत्यारोप, ठरावातील टक्केवारी, टक्केवारीवरून झालेले आरोपाचे राजकारण चांगलेच रंगले. त्याचा शेवटही आरोपांच्या फैरीत झाल्यानेच त्याचा शेवट त्याच पद्धतीने झाल्याचे दिसते. शेवटची सभा नोव्हेंबरमध्ये झाली. त्यानंतरही डिसेंबरमध्ये एक सभा होईल, असे प्रशासकीय पातळीवर सांगितले जात होते. मात्र, तीही सभा घेण्याची मानसिकता एकाही नगरसेवकाची दिसत नव्हती. त्याच मानसिकतेमुळे तब्बल १४७ हून अधिक ठराव स्वाक्षरीविनाच राहिल्याचे वास्तव स्वीकरावेच लागेल.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

मुदत संपण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर तब्बल २६७ ठराव स्वाक्षरीसाठी गेले होते. त्यातील केवळ १२५ ठरावांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. उर्वरित १४७ ठरावांवर स्वाक्षऱ्याच नाहीत. पालिकेची मुदत संपल्याने त्यांचे नगरसेवकपदच रद्द झाल्याने आता त्या ठरावावर स्वाक्षऱ्या करण्याचा त्यांचा अधिकार नाही. त्यामुळे तब्बल १४७ ठरावांवर नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील यांच्या स्वाक्षऱ्याच नाहीत. शेवटची सभा नोव्हेंबरमध्ये उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेत तब्बल ८२ विषय होते. त्याही एकाही विषयावर त्यांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे तेही सगळे विषय लटकले आहेत. अनेक महत्त्वाच्या विषयांचा त्यात समावेश होता, तर उर्वरित तब्बल ६५ विषयांवर नगराध्यक्षा शिंदे यांची स्वाक्षरी नाही. त्यातही अनेक महत्त्वांच्या विषयांचा समावेश आहे.

पालिकेच्या मासिक सभेतील १४७ ठरावांवर स्वाक्षऱ्या नाहीत हे वास्तव आहे. त्यातील काही ठरावांवर प्रसासकीय पातळीवर निर्णय घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. मात्र, बहुतांशी ठराव तसेच राहणार आहेत. ते पुढच्या कौन्सिलमध्ये मंजुरीला ठेऊन त्यावर निर्णय घ्यावा लागेल.

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
loading image
go to top