
26/11... मुंबईवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या शत्र सज्ज अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य आलेल्या तुकाराम ओंबळेंचा पराक्रम आजही समस्त भारतीयांच्या हृदयात ठसून राहिला आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने त्यांना मनोमन अभिवादन करतो. त्यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा असे ग्रामस्थांना वाटते.
केळघर (जि. सातारा) : मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणाऱ्या केडंबे (ता. जावळी) येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे स्मारक गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या हुतात्म्याच्या स्मारकाबाबत शासनाबरोबर जिल्हा प्रशासन उदासीन आहे.
हुतात्मा ओंबळे यांच्या असीम धैर्य व धाडसामुळे मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे, हे स्पष्ट झाले. आपल्या हातातील काठीच्या साहाय्याने ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. त्यांच्या पराक्रमाची चर्चा संसदेतही झाली होती. तत्कालीन विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ओंबळे यांच्या या पराक्रमाची माहिती सभागृहात दिली होती. अमेरिकेच्या संसदेतदेखील त्यांच्या या पराक्रमाचा गौरव करण्यात आला होता. हुतात्मा ओंबळे यांचे नाव गुजरात राज्यातील पाइपलाइनला देण्यात आले आहे, तर मुंबई येथील गिरगाव चौपाटीच्या प्रवेशद्वाराजवळ ओंबळेंचे स्मारक उभारण्यात आले आहे. गोरेगाव, बोरिवली येथील उद्यानांनाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबईतील विविध रस्त्यांना हुतात्मा ओंबळे यांचे नाव दिले गेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होत असताना मात्र त्यांच्या जन्मगावात त्यांचे स्मारक 13 वर्ष उलटून गेली तरी होत नाही, हे दुर्दैव आहे. या स्मारकासाठी ग्रामपंचायतीने जागाही उपलब्ध करून दिले आहे. स्मारकासाठी एक कोटी रुपये निधीही मंजूर आहे. मात्र, स्मारक का रखडले आहे याचे कोडे ग्रामस्थांनाच पडले आहे.
कसाबची साक्ष दिली तेव्हाच हे ठरवलं होतं, कसाबला ओळखणाऱ्या देविकाला व्हायचंय पोलिस
हुतात्मा ओंबळेंच्या या पराक्रमामुळे केडंबे हे छोटेशे गाव देशात प्रसिद्ध झाले. त्यांचे स्मारक झाल्यास केडंबेचे महत्त्व वाढणार असून, ओंबळेंचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारक झाल्यास पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने आश्वासक वातावरण निर्माण होऊन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. मात्र, 13 वर्षांपासून शासन व प्रशासनाला स्मारकासाठी मुहूर्त मिळत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. वास्तविक जिल्हा प्रशासनाने पुढे होत कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, दप्तर दिरंगाईचा फटका बसला आहे. 13 वर्षांत तीन सरकारे आली; पण ओंबळेंच्या स्मारकाचा प्रश्न जैसे थे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळेंचे स्मारक त्यांच्या जन्मगावी केडंबेत वेळेत होणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे स्मारक रखडले आहे.
- एकनाथ ओंबळे, हुतात्मा ओंबळेंचे चुलत बंधू.
अमेरिकेत भारताच्या सुपुत्रांची हवा! नासात हवामान अभ्यासासाठी आर्य, शिवराजची निवड
सांगली जिल्ह्यातून जावळी येथे नुकतीच बदली झाली आहे. हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाबाबत माहिती घेऊन हे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करू.
- राजेंद्र पोळ, तहसीलदार, जावळी
Edited By : Siddharth Latkar