esakal | साताऱ्यात बसणार हवामानदर्शक यंत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

satara

साताऱ्यात बसणार हवामानदर्शक यंत्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहरातील हवेची शुद्धता, गुणवत्ता व प्रदूषण पातळी नागरिकांना समजावी, यासाठी पालिकेने शहराच्‍या विविध भागांत हवामान दर्शक यंत्रे व फलक बसविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रशासकीय कार्यवाही सध्‍या पालिका प्रशासनस्‍तरावर सुरू आहे.

हवेतील प्रदूषण कमी करण्‍यासाठीच्‍या उपाययोजना केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्‍या वतीने राबविण्‍यात येत आहेत. यासाठी त्‍या मंत्रालयाने क्लीन एअर अभियान राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे.

या अभियानात हवेतील प्रदूषण कमी करण्‍याबरोबरच त्‍यासाठी कार्यरत असणाऱ्या घटकांना पायबंद घालण्‍यावर जोर देण्‍यात येणार आहे. सातारा शहराचा विस्‍तार झपाट्याने होत असून, वाहनांच्‍या संख्‍येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहनांची वाढती संख्‍या, औद्योगिकीकरण व इतर कारणांतून निर्माण होणाऱ्या वायूंमुळे वातावरणाची शुद्धता कमी होत आहे.

हेही वाचा: 'राजू शेट्टींवर आरोप करण्याचा अधिकार सदाभाऊंना कोणी दिला?'

साताऱ्यालगतच्‍या डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या वनसंपदेमुळे शहरातील वातावरण आल्‍हाददायक आणि स्‍वच्‍छ राहण्‍यास मदत होत आहे. आजूबाजूचा निर्सग, वनराईमुळे सध्‍याची साताऱ्यातील प्रदूषण पातळी मानवी आरोग्‍यास जास्‍तीची हानिकारक नसली तरी येत्‍या काही वर्षांत ती धोकापातळी ओलांडू शकते. संभाव्‍य शक्‍यतेच्‍या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने प्रदूषण कमी करण्‍यासाठीच्‍या उपाययोजना राबविण्‍यावर भर दिला आहे.

याच अनुषंगाने पालिकेने शहरातील विविध भागांत हवामान दर्शविणारी यंत्रे आणि डिजिटल फलक उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. ‍सद्य:स्‍थितीत पालिकेलगत, बाँबे रेस्‍टॉरंट व शहराच्‍या विविध भागांत अशी यंत्रे आणि फलक उभारण्‍यात येणार असून, त्‍यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हवामान दर्शविणारी यंत्रे आणि फलकांमुळे प्रशासकीय यंत्रणांना तसेच नागरिकांना आपल्‍या भागातील, शहरातील हवेची गुणवत्ता, शुध्‍दता समजण्‍यास मदत होणार आहे.

शहरातील हवेची गुणवत्ता, शुध्‍दता नागरिकांना तसेच प्रशासकीय यंत्रणांच्‍या लक्षात येण्‍यासाठी ही यंत्रणा आणि फलक उभारण्‍याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी शासनाची मदत घेण्‍यात येणार असून, त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तयार करण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावानुसार पुढील काळात कार्यवाही करण्‍यात येणार असून, लवकरात लवकर ही यंत्रणा का‍र्यान्‍वित करण्‍याचा पालिकेचा प्रयत्‍न राहणार आहे.

-मनोज शेंडे, उपाध्‍यक्ष, सातारा पालिका

loading image
go to top