फलटणमधील रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा नको : संजीवराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

phaltan

फलटणमधील रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा नको : संजीवराजे

फलटण शहर : फलटण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. परंतु, ही रस्त्यांची कामे निश्चितपणे दर्जेदार होतील. त्यात कोणी हलगर्जीपणा केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही, असा इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.

फलटण शहरामधील विविध रस्त्यांचे भूमिपूजन संजीवराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा नीता नेवसे, ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे आदींसह नगरसेवक, नगरसेविकांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमधील विविध रस्त्यांची कामे फलटण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. आगामी काळात सर्वच रस्त्यांची कामे ही दर्जेदारपणेच होतील, अशी खात्री आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरामध्ये विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. आगामी काळामध्ये फलटण शहरामधील सर्वच्या सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा नीता नेवसे यांनी यावेळी सांगितले. या वेळी प्रभाग क्रमांक दोन, सहा, सात, दहा, ११ व १२ मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन दीपक चव्हाण, संजीवराजे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.