Satara : ओमिक्रॉनसाठी एक आयसीयू वॉर्ड राखीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Satara District Hospital

सातारा : ओमिक्रॉनसाठी एक आयसीयू वॉर्ड राखीव

सातारा : परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे(omicron) रुग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे आरोग्य विभाग(helath department) सतर्क झाला. त्याचाच एक भाग म्हणून नव्या व्हायरसने बाधित झालेल्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील(district hospital satara) एक आयसीयू वॉर्ड (icu ward)राखीव ठेवण्यात आला आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून आलेल्या नागरिकांचे होम आयसोलेशन व आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला जात आहे. गेल्या २० दिवसांत जिल्ह्यामध्ये विविध देशांतून ५०३ नागरिक आले आहेत. या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच आरेाग्य विभागाकडून या नागरिकांच्या गृहविलगीकरणाकडे लक्ष ठेवले जात आहे.

या प्रक्रियेच्या माध्यमातूनच फलटण तालुक्यात युगांडा या देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी झाली. कोरेाना पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हायरस कोणता आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये तीन नागरिकांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. हे नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. फलटणचे बाधित आल्यानंतर झालेल्या इतर नागरिकांच्या तपासणीत परदेशातून आलेले आणखी काही जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली असण्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार संबंधितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

ओमिक्रॉन बाधित असल्याचा नवा रुग्ण अद्याप समोर आलेला नसला तरी, जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने मात्र असे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार तातडीने करता यावेत यासाठी तयारी केली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण हे अन्य कोरोना बाधित रुग्णांसोबत ठेवले जाणार नाही. त्यातून कोरोनाच्या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे.

१४ बेडची व्यवस्था

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील तीन अतिदक्षता विभागांपैकी एक १४ बेडची व्यवस्था असलेला एक आयसीयू ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर या रुग्णांना कशा प्रकारे उपचार द्यायचे, कोणती दक्षता घ्यायची याबाबतची माहितीही आरोग्य विभागाने घेतली आहे.

टॅग्स :Satara