
सातारा जिल्हा परिषदेचा एक गट, दोन गण वाढणार
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार २०११ ची लोकसंख्या ग्रहित धरून गट, गणांची रचना तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ६४ वरून ६५ वर, तर पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या १२८ वरून १३० वर गेली आहे. या कच्च्या प्रारूप यादीला आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच आरक्षण काढण्याची प्रक्रिया होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने २०११ ची लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचनेने प्रारूप तयार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेने याबाबत सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच पालिकांची झालेली हद्दवाढ लक्षात घेऊन गट, गणांची रचना बदलली आहे.
सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्याने सातारा तालुक्यातील दोन गट व चार गण कमी झाले आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यात पूर्वी दहा गट होते, ते आता आठ होणार आहेत. गणांची संख्या २० वरून १६ वर आली आहे. कोरेगाव, खटाव आणि फलटण तालुक्यांत प्रत्येकी एक गट व दोन गण असे तीन गट आणि सहा गण वाढणार आहेत. साताऱ्यातील दोन गट व चार गण कमी होणार असल्याने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या फक्त एकने वाढणार असून पंचायत समिती सदस्यांची संख्या दोनने वाढेल.
हेही वाचा: ..आणि बच्चू कडू धावले..महामार्गावर जखमी पती पत्नी यांना घातले स्वतःच्या गाडीत
जिल्हा परिषदेची आताची सदस्यसंख्या ६४ असून आता नव्या रचनेत ती ६५ होणार आहे. पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या १२८ वरून १३० वर जाणार आहे. त्यामुळे पुनर्रचनेत मतदारसंघ वाढणार असल्याचे चित्र आहे.
कोरेगाव, खटाव, फलटण तालुक्यांत पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन जागा व जिल्हा परिषदेची प्रत्येकी एक जागा वाढणार असल्याने इच्छुकांसाठी गुड न्यूज आहे. सातारा तालुक्यात दोन गट व चार गण कमी होणार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर जाण्यासाठी इच्छुकांना आता सातारा पालिकेत लक्ष घालून नगरसेवक व्हावे लागणार आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच अभ्यास सुरू केला आहे. गट, गणांची बदललेली संख्या आणि सातारा तालुक्यातील कमी झालेली संख्या लक्षात घेऊन मतदारसंघ वाढलेल्या ठिकाणी लक्ष देऊन पक्षातील इच्छुकांना संधी दिली जाणार आहे. सातारा तालुक्यातील इच्छुकांना आता सातारा पालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे लागणार आहे.
गट व गणांची स्थिती
तालुकानिहाय गटांची व कंसात नवीन संख्या : सातारा- १० (८), कऱ्हाड-१२ (१२), कोरेगाव- ५ (६), माण- ५ (५), खटाव- ५ (५), फलटण- ७ (८), पाटण- ७ (७), जावळी- ३ (३), महाबळेश्वर- २ (२), खंडाळा- ३ (३), वाई- ४ (४).
तालुकानिहाय गणांची संख्या : सातारा- १६, कऱ्हाड- २४, कोरेगाव- १२, माण- १०, खटाव-१०, फलटण- १६, पाटण- १४, जावळी- ६, महाबळेश्वर- ४, खंडाळा- ६, वाई-८.
सध्याच्या परिस्थितीत पालिकांची झालेली हद्दवाढ आणि २०११ ची तालुकानिहाय लोकसंख्या लक्षात घेऊन आयोगाच्या सूचनेनुसार कच्चे प्रभाग प्रारूप तयार केले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात एक गट व दोन गणांची संख्या वाढत आहे. आयोगाची पुढील सूचना आल्यानंतरच त्याला मान्यता घेऊन आरक्षण केले जाईल.
-प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी, महसूल विभाग
Web Title: One Two Groups Will Be Formed In Satara District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..