Karad : शेतकऱ्यांवर पपई फुकट वाटण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karad : शेतकऱ्यांवर पपई फुकट वाटण्याची वेळ

Karad : शेतकऱ्यांवर पपई फुकट वाटण्याची वेळ

कऱ्हाड : बाजारपेठेत सध्या आवक वाढल्याने पपईला दोन रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर मिळत नसल्याने आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यांपासून पपई फुकट वाटायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: एसटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेने कोल्हापूरात प्रवासी बस स्थानकातच

शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा असे सांगितले जात आहे. त्यातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपईचे उत्पादन घेतले आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळाले. अलीकडे पपईची बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांतून पपईला मागणी नसल्याने उठाव नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पपईला मिळणारे सात ते १२ रुपये किलोचा दर सध्या दोन रुपयांवर आला आहे. परिणामी पिकासाठी घातलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज काढून पपईचे पीक घेतले आहे. त्यातच सध्या दर नसल्याने बळिराजासमोर कर्ज कसे भागवायचे हा मोठा प्रश्न आहे.

नाशवंत असल्याने पपई जास्त काळ शेतात राहिली तर ती वाया जाणार आहे. तोड्याचाही खर्च सध्याच्या दरातून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईचा तोडाच दोन आठवड्यांपासून केला नाही. शेतकऱ्यांनी सध्या फुकट पपई वाटण्यास सुरुवात केली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांकडेही वळत आहे. मात्र, त्यांना फळे आल्यावर किमान उत्पादन खर्च तरी निघावा एवढा दर मिळेल याची खात्री शासनाने घेण्याची गरज आहे.

हेही वाचा: एसटीचं विलीनीकरण तुर्तास नाहीच; मूळ वेतनवाढीला मंजुरी

"आम्ही पपई घेतली आहे. मात्र, त्याला शाश्वत दर नाही. सध्या दोन रुपये दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्च आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवडे पपईचा तोडाच केला नाही. सध्या पपई फुकट वाटत आहोत."

- दिलीप पाटील, शेतकरी

loading image
go to top