फलटण : उसाने भरलेल्या ट्रॉलीचा थरार; दुभाजकाला धडकल्याने अनर्थ टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 tractor

फलटण : उसाने भरलेल्या ट्रॉलीचा थरार; दुभाजकाला धडकल्याने अनर्थ टळला

फलटण शहर (सातारा) : शहरातील वर्दळीचा व मध्यवर्ती भाग समजल्‍या जाणाऱ्या डीएड चौकात रिंगरोडवर काल रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हरलोड भरलेली उसाची ट्रॉली लॉक तुटल्याने पाठीमागे वेगाने धावली. परंतु, तेथे वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. एकूणच ‘काळ आला पण वेळ आली नव्हती’ असेच उद्‌गार अनेकांनी या घटनेनंतर काढले.

येथील डीएड चौकातून जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र चढ असल्याने एकेरी वाहतूक असतानाही ही वाहने लगतच्या दुसऱ्या रोडने चुकीच्या बाजूने धावतात. काल ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरपासून लॉक तुटल्याने उसाने भरलेली ट्रॉली उताराने मागे धावू लागली. या प्रकाराने अनेकांचे धाबे दणाणले. ही ट्रॉली थांबविण्यासाठी अनेक लोकही धावले. परंतु, त्यास यश आले नाही. ट्रॉली वेगाने मागे येऊन रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला व त्यावरील विजेच्या खांबाला धडकून थांबली. हा रस्ता वर्दळीचा असला तरी हा प्रकार घडला, त्या क्षणी तेथे वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकाराने नागरिकांमधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले.

हेही वाचा: "आमचा विजय नक्की होणार"; राज्यपालांच्या भेटीनंतर क्रांतीला विश्वास

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुकानातील ग्राहकांची वाहने अगदी निम्म्या रस्त्यावर लागत असल्याने या परिसरात नेहमीच अपघाताचा धोका कायमपणे राहिलेला आहे. त्याचबरोबर ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक गैरबाबींकडे पोलिस प्रशासन डोळेझाक करीत असल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही रिंगरोडवर झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, त्यापासून नगरपालिका व पोलिस प्रशासनाने कोणताही बोध घेतला नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

Web Title: Phaltan Vibration Trolley Full Sugarcane Hitting Divider Averted Disaster

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top