दुर्वाचे अस्तित्व धोक्यात; जाणून घ्या नेमकं कारण

दुर्वाचे अस्तित्व धोक्यात; जाणून घ्या नेमकं कारण

सातारा : गणांचा अधिपती गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते, कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे.

अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला; पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. 

दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. गणरायाचे गणेश चतुर्थीला शनिवारी (ता. २२) आगमन झाले. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भक्त आपल्या लाडक्या बाप्पांची मनोभावे सेवा करत आहेत. मात्र, बाप्पांच्या आवडत्या दुर्वा आणण्यासाठी भक्तांना पायपीट करावी लागत आहे. तणनाशकांच्या वाढत्या वापराने दुर्वा मिळणे आणखी कठीण बनले आहे. ग्रामीण भागात शेतीची मशागत करताना पीक टुमदार उगवून येण्यासाठी शेतकरी ताणनाशचा वापर करतो. जेणे करुन शेतामध्ये असणा-या गवताचा (तण) नाश होईल, तो यागचा उद्देश! आज सर्रास शेतामध्ये आपल्याला दुर्वाचे दर्शन होते. मात्र, ग्रामीण भागात या दुर्वा वनस्पतीला फारसं महत्व नाही आणि दुर्वा ही औषधी वनस्पती आहे, याची देखील कोणाला कल्पना नाही. 

चतुर्थीच्या उत्सवकाळात गणरायाला दोन्ही वेळा पूजा व आरती करताना २१ दुर्वांच्या जुड्या वाहिल्या जातात. भक्त आपल्या लाडक्या बाप्पांसाठी दररोज दुर्वांच्या जुड्या आणतात. या दुर्वा हरळी या गवतापासून मिळतात. शहरी भागात दुर्वांच्या जुड्या विक्रीसाठी येतात. ग्रामीण भागातील गणेशभक्त शिवारात असलेल्या हरळीपासून दुर्वा काढून जुड्या बनवतात. या आधी दुर्वा मोठ्या प्रमाणात मिळत होत्या; परंतु शेती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत, त्यामुळे शेतकरी तणनाशकाव्दारे दुर्वांचा नाश केला जात आहे.

परिणामी, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारात दुर्वा शोधाव्या लागत होत्या. गणेश चतुर्थी दिवशी तर सातारा शहरात दुर्वांच्या जुडीचा भाव ५० रुपयापर्यंत पोहोचला. त्यानंतर शहरात दुर्वांच्या जुडीची मुबलक आवक निर्माण झाली. आता दुर्वाची मागणी अधिक वाढल्याने ही जुडी ३० ते १० रुपयाच्या किमतीत मिळत आहे. ग्रामीण भागातील लोक शहरी भागात या जुड्या विक्रीसाठी घेऊन येतात. त्यात खुडलेल्या दुर्वाला विशेष अशी किंमत आकारण्यात आली असून शेतातून थेट विक्रीसाठी आणलेल्या दुर्वाला प्रमाणीत कमीत आकारली जात आहे. शहरी भागात खुडलेल्या दुर्वालाच अधिक पसंती मिळत आहे. 

तणनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे तणाबरोबरच हरळीही नष्ट होत आहे. हरळी हे वेगाने वाढणारे व चिवट तण असल्याने शेतकरी त्याच्यावरही तणनाशक वापरत असल्याने शिवारातून हरळी नामशेष होत आहे. त्यामुळे बाप्पांच्या आवडत्या दुर्वा गोळा करताना भक्तांना पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा या उत्सवकाळात हरळी या वनस्पतीवर उदरनिर्वाह चालत असतो. काही भागात या हरळी वनस्पतीची लागवड केली जाते. यावरती जनावरांचे देखील पोट भागत असते. मात्र, ग्रामीण भागातही हरळीचं अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर असून नंतरच्या काळात बाप्पांना रेडिमेड स्वरुपाची दुर्वा वाहण्याची वेळ नाकारता येत नाही. 

दुर्वा जुडींची किंमत तीस रुपयांच्या घरात
गणेशोत्सवात हरळीला (दुर्वा) अनन्यसाधारण महत्व आहे. ग्रामीण भागात हरळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने तेथील स्थानिक लोक हरळी विक्रीसाठी सातारा गाठतात. सध्या या हरळीचा भाव प्रति नग १० ते ३० रुपयाच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. शहरासारख्या भागात हरळी क्वचितच पहायला मिळते, त्यामुळे चतुर्थीत हरळीसाठी ग्रामीण भागातील लोकांवर अवलंबून रहावे लागते. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी म्हणजे ता. २१ व २२ रोजी याच हरळीचा भाव तब्बल ५० रुपये जुडी असा होता. मात्र, गणेशोत्सव सुरु झाल्यापासून ही हरळी आता १० रुपयांच्या किमतीत विकली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com