तिन्ही पक्षांची ताकद दाखवून विचारांची निवडणूक विचारानेच जिंकू : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
Friday, 20 November 2020

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कऱ्हाड येथे कार्यकर्ता मेळावा झाला.

कऱ्हाड (जि. सातारा) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देणे गरजेचे आहे, ही निवडणूक विचारांची आहे आणि ही आपण जिंकणे महत्त्वाचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी युवा नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांचे पुतणे रणजित लाड, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांचे प्रतिनिधी श्री. वाळके, दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, कऱ्हाड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र यादव, अशोकराव पाटील उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ""पुणे विभागाचे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून येतील, यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर व शिक्षकच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत. प्रत्येक निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असते, तसेच या निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक मत मतपेटीत जाण्यासाठी मतदारांना अधिकाधिक जागृत करणे गरजेचे आहे. 

भाजपला धक्का देत 'पवार' पुन्हा राष्ट्रवादीत, खटाव तालुक्‍यात 'पावर' वाढणार!

तिन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून देणे गरजेचे आहे, ही निवडणूक विचारांची आहे आणि ही आपण जिंकणे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघ मोठा आहे, पाच जिल्ह्यांत उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे शक्‍य होईल, असे होणार नाही. यासाठी आपण सर्वांनी स्वतः उमेदवार आहोत असे समजून प्रचार करावा तरच आपल्याला यश मिळेल.'' मला विश्वास आहे, की पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सोडवले जातील. यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून द्यावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rally Was Held At Karad For The Campaigning Of Mahavikas Aghadi Candidates Satara News