RTE Admission : आरटीईची प्रवेश प्रक्रिया ठप्प

तांत्रिक अडचणीचा फटका; दहा दिवस सर्व्हर डाऊन
rte admission process ten days server down education satara
rte admission process ten days server down education sataraesakal

सातारा : बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी पाच एप्रिलला ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्यानुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १३ एप्रिलपासून सुरू झाली असतानाही दहा दिवस तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रकिया ठप्प झाली आहे. त्यामुळे पालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीईअंतर्गत खासगी शाळांत जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार ८२१ जागांसाठी चार हजार ३४० हून अधिक ऑनलाइन अर्ज आले होते.

या अर्जानंतर ऑनलाइन लॉटरी सोडत झाल्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १३ ते २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांना मोबाईलवर मेसेजही पाठविण्यात येत आहेत. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊनचा अडथळा येत असल्याने पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, आरटीईच्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कोरोना काळात म्हणजे एक एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रक्रिया अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सर्व तालुकास्तरावर पडताळणी केंद्राची तपासणी करून पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावीत. पालकांना अडचणी येऊन नयेत याची दक्षता घ्यावी, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती पाहण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.

मुदत वाढणार..?

आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत १३ ते २५ एप्रिलपर्यंत आहे. मात्र, दहा दिवस तांत्रिक अडचणींमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे मुदतीत प्रवेश होणार का नाही, याबाबत पालकांत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com