
हवामानात सतत होणारा बदल व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बळीराजा संकटात! ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका; पिकांचे उत्पन्न घटण्याची भीती
कऱ्हाड (जि. सातारा) : यंदा अवकाळी पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून आहेत; परंतु हवामानात सतत होणारा बदल व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे.
सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात भाताचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या या पिकाचा पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखी स्थिती झाली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे खरिपातील इतरही पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाडच कोसळल्यासारखी स्थिती झाली होती. त्यातूनही सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिके चांगली घेण्याचा इरादा केला. त्यानुसार त्यांनी नोव्हेंबरच्या पंधरवड्यापर्यंत पेरण्या सुरू होत्या. जमिनीतील ओलीमुळे पिके चांगली उगवून आली होती. मात्र, गेली दोन महिने अपवाद वगळता थंडीने गायब आहे. त्यामुळे थंडीच्या दवावर येणारी रब्बी ज्वारी व हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना
शिवाय सातत्याने राहिलेले ढगाळ वातावरण रोग व किडीसाठी पोषक ठरले आहे. पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. गहू व ज्वारीवर करपा तांबेरा पडला आहे, तर हरभरा घाटेआळीच्या कचाट्यात सापडले आहे. कांदा पिकदेखील प्रदूषित वातावरणामुळे पिवळे पडले आहे. सातत्याने हवामानात बदल होत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने, ढगाळ वातावरणामुळे रब्बी, भाजीपाला व फळशेतीवर काही प्रमाणात रोगाचे सावट पसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी औषध फवारणी करावी लागत आहे, तरीही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निर्सगाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, त्याचे आर्थिक चक्र मात्र बिघडले आहे. अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे. वातावरणातील बदलाने पिकांच्या उत्पादनावर होणार असून, ते घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बदलत्या वातावरणामुळे पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्यानुसार पिकांवर औषधांची फवारणी करावी.
-रियाज मुल्ला, तालुका कृषी अधिकारी, कऱ्हाड
संपादन : बाळकृष्ण मधाळे