सातारा : चांदोबाचा लिंबला माउलींचा जयघोष

सोहळा दुपारी पावणेचारच्या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पोचला
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal

तरडगाव : लोणंदकरांनी जड अंतःकरणाने निरोप दिल्यावर मजल- दरमजल करीत तरडगावच्या (ता. फलटण) दिशेने निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब परिसरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज उत्साहात साजरे झाले. शितोळे सरकारांच्या ‘हिरा’ व ‘मोती’ या दोन्ही अश्‍वांनी रिंगणातून दौड घेतल्यानंतर टाळ- मृदंगाचा ध्वनी टिपेला पोचला अन् भाविकांसह वारकऱ्यांनी केलेल्या माउली-माउलींच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज दुपारी लोणंदकरांचा निरोप घेण्यापूर्वी बारा वाजता पादुकांची पूजा झाली. महानैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. सरहद ओढा ओलांडून फलटण तालुक्याच्या हद्दीत पालखीने प्रवेश केला. सोहळा दुपारी पावणेचारच्या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पोचला. चोपदार राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने रिंगण लावून घेतले. तत्पूर्वी रिंगण मार्गावर युवक- युवतींनी रांगोळी रेखाटून उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.

रिंगण लावल्यानंतर वारकरी भजन करीत असताना त्यांच्या नजरा सोहळ्याच्या अग्रभागाकडे खेळल्या. तेवढ्यात शितोळे सरकार यांचे ‘हिरा’ व ‘मोती’ हे दोन्ही अश्व वेगाने दौडत पालखीकडे येऊ लागताच उपस्थित वैष्णवांनी माउलींचा गजर करीत आनंद लुटला. दोन्ही पालखी रथाला फेरी मारून पालखी जवळ येताच अश्‍वांच्या भावी पालखी सेवेकऱ्यांनी बुक्का लावून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातले आणि दोन्ही अश्वांना डाळ व गुळाचा खुराक दिला. पुन्हा हे अश्व सोहळ्याच्या अग्रभागाकडे धावत निघताच माउलींचा जयघोष आसमंतात पसरला.

मस्तकी लागली अश्वांची पायधूळ

ज्या मार्गावरून अश्व धावले, तेथील पायधूळ भाविकांनी आपल्या मस्तकी लावली आणि सोहळ्यातील उभ्या रिंगणाचा नयनरम्य आनंद क्षण अनुभवला. वारीतील पहिले उभे रिंगण झाल्यानंतर बाळासाहेब चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील चांदीचा दंड फिरवून सोहळा पुढे मार्गस्थ करण्याचे निर्देश दिले. पुढे चाळशीमळा येथील भाविकांचे स्वागत स्वीकारून सोहळा सायंकाळी पाचच्या दरम्यान तरडगावला पोचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com