Satara Bank Election : वाई, पाटण, खटावात शांततेत मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election : वाई, पाटण, खटावात शांततेत मतदान
Satara Bank Election : वाई, पाटण, खटावात शांततेत मतदान

Satara Bank Election : वाई, पाटण, खटावात शांततेत मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी वाई केंद्रावर आज ९३.१८ टक्के मतदान झाले. यावेळी १३२ पैकी १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत पार पडले. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्हा खरेदी-विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि वाई सोसायटी मतदारसंघातून नितीन पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तालुक्यात चुरस नसल्याने एकतर्फी वातावरण दिसून आले. दोन महिला राखीव, इतर मागास वर्ग व बॅंक-पतसंस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी येथील किसन वीर महाविद्यालयातील केंद्रावर मतदान झाले. यावेळी दोन महिला राखीव व इतर नागरिकांच्या मागास वर्गातील उमेदवारास १२३, तर बँक, पतसंस्था मतदारसंघात ३१ पैकी २९ मतदान झाले, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी सहायक निबंधक गणपतराव खामकर व उपक्षेत्रीय अधिकारी शैलेश जाधव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान सुरळीत व लवकर व्हावे, यासाठी प्रयत्नशील होते. आमदार मकरंद पाटील व राजेंद्र राजपुरे यांनी केंद्रावर भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

खटावला खेळीमेळीत शंभर टक्के मतदान

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी खटाव तालुक्यात १०० टक्के मतदान झाले. पोलिस बंदोबस्तात शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात ही मतदान प्रक्रिया पार पडली. येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. माजी आमदार व अपक्ष उमेदवार प्रभाकर घार्गे हे एका प्रकरणात अटकेत आहेत. मतदानादिवशी त्यांना मतदान केंद्रावर हजर राहण्याची न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर घार्गे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर हजर झाले. श्री. घार्गे व सहकार पॅनेलचे उमेदवार नंदकुमार मोरे यांच्यातील सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोसायटी मतदारसंघासाठी एकूण १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याशिवाय महिला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग पुरुष प्रवर्गासाठी १५०, नागरी पतसंस्था, बँका प्रवर्गासाठी एकूण १८, गृहनिर्माण, दुग्ध व इतरसाठी चार, सहकारी खरेदी-विक्री संघासाठी एक, कृषी उत्पादन, प्रक्रिया सहकार संस्थांसाठी एक मतदार तसेच औद्योगिक विणकर, मजूर, पाणीपुरवठासाठी सर्व २३ मतदारांनी मतदान केले. सकाळी मतदान केंद्रावर काही वेळ तणावपूर्ण वातावरण दिसत होते. मात्र, नंतर शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्र परिसरात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, इंदिरा घार्गे, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, प्रा. अर्जुनराव खाडे, माजी सभापती मानसिंगराव माळवे ठाण मांडून होते.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

पाटणमध्ये एका मतदाराची दांडी; शांततेत ९५.५५ टक्के मतदान

पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पाटण येथील मतदान केंद्रावर शांततेत ९५.५५ टक्के मतदान झाले. एकूण २०३ मतदारांपैकी १९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर सोसायटी मतदारसंघात १०३ पैकी १०२ मतदारांनी मतदान केले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्हा बँकेच्या रणांगणात पुन्हा देसाई-पाटणकर अशी प्रतिष्ठेची लढत लागल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे होते. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. परंतु, नऊ वाजले तरी मतदान केंद्राकडे कोणी फिरकले नव्हते. साडेनऊच्या दरम्यान गेली अनेक दिवस टुरवर असणारे सोसायटी मतदार घेऊन युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर दाखल झाले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे आपल्या समर्थक मतदारांसह केंद्रावर दाखल झाले. सत्यजितसिंह पाटणकर, शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि रविराज देसाई या मातब्बरांनी मतदान केले. मतदान केंद्रावर आज दिवसभर सत्यजितसिंह पाटणकर ठाण मांडून होते. मात्र, मतदान केल्यानंतर लगेच गृहराज्यमंत्री निघून गेले. दुपारी १२ वाजेपर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोसायटी मतदारसंघासाठी १०३ मतदारांपैकी १०२ मतदारांनी, तर नागरी बँका मतदारसंघासाठी २९ पैकी २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राखीव जागांसाठी एकूण २०३ मतदारांपैकी १९६ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे एकूण ९६.५५ टक्के मतदान पार पडले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सहकार अधिकारी गीतांजली कुंभार यांनी पाच मतदान अधिकारी व एक शिपाई यांच्या मदतीने काम पाहिले. मतदान केंद्राभोवती पोलिसांचा कडक पहारा होता. पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी व २८ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

मंत्री देसाईंकडे ओळखपत्राची मागणी

मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व अधिकाऱ्यांची विचारपूस केली. मतदान करण्यासाठी मंत्री देसाई यांना मतदान अधिकाऱ्यांनी ओळखीसाठी आधारकार्डची मागणी केली. ‘मंत्र्यांना आधार कार्ड नसते, तुम्हाला सहकाराचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे,’ असे मंत्री देसाई यांनी अधिकाऱ्याला सुनावले. मात्र, या घडलेल्या घटनेची दिवसभर तालुक्यात चर्चा सुरू होती.

loading image
go to top