"शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रिपद" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रिपद"
"शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रिपद"

"शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रिपद"

पाटण : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या कृपाशीर्वादानेच राज्यात महाविकास आघाडी होऊन शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत राहून कधी राष्ट्रवादीला खुनवायचे, तर कधी काँग्रेसला डोळा मारायचा, भाजपची सत्ता आली, की तत्कालीन मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रिपद मिळाले. राष्ट्रवादीच्या मेहरबानीतून मिळालेल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मगच त्यांनी राष्ट्रवादीला इशारा द्यावा, असे आव्हान जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पाटणकर म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीला इशारा देण्याइतपत शंभूराज देसाई मोठे नाहीत किंवा शिवसेना कळण्याइतपत ते सेनेशी कधीही एकनिष्ठ नाहीत. केवळ सध्या सत्तेत वाटा मिळाल्याने त्यांना शिवसेनेचा उसना कळवळा आहे. हिंमत असती तर जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी पॅनेलमधून त्यांना बाहेर काढूनही ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले असते. जिल्ह्यात स्वतःच्या हिमतीवर विरोध करत शिवसेनेतून निवडून आलेले संचालक आहेत. अगदी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या समर्थकांना निवडून आणण्याची किमयाही शिवसेना आमदारांनी याच निवडणुकीत दाखवली. मग यांनाच राष्ट्रवादीची गरज का वाटते हे त्यांनी जाहीर करावे. केवळ सत्ता व अर्थकारणाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो, हा त्यांचा भ्रम बाजूला सारून मतदारांनी त्यांचा बहुमताने दारुण पराभव केला. या पराभवात दोष राष्ट्रवादीचा का तुमचा? आजपर्यंतचा गाड्यांचा कर्णकर्कश भोंगा मतदारांनी बंद केला. आता राष्ट्रवादीला इशारा देत राजकीय भोंगा वाजवण्याचा खटाटोप कशाला करत आहात.’’

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

यापूर्वी काँग्रेसचे मुख्यमंत्री असले, की त्यांच्याशी घरोबा करायचा, राष्ट्रवादीचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न बोलवताही आत्मक्लेशमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा किंवा वेळप्रसंगी सेनेशी गद्दारी करून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीशी आतल्या हाताने हातमिळवणी करायची, भाजपचा मुख्यमंत्री झाला की मित्रत्वाचे गोडवे गायचे हे कदाचित ते विसरले असतील; पण जनता विसरलेली नाही. गेल्या वेळी ते शिवसेनेचे आमदार असतानाही स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या विरोधात सोयीस्करपणे तालुका विकास आघाडी स्थापन करून शिवसैनिकांचा पराभव करणाऱ्यांनी सेनेचा खोटा कळवळा आणू नये, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: एसटीचं विलीनीकरण तुर्तास नाहीच; मूळ वेतनवाढीला मंजुरी

"भविष्यात वेगळे लढण्याच्या धमक्या कोणाला देता? आम्ही कायम तुमच्याशी राजकीय दोन हात करायला तयारच आहोत. वेगळे लढल्यावर आम्ही काय करतो याचा ट्रेलर दाखवला आहे. येणाऱ्या काळात राजकीय पिक्चरही दाखवू."

- सत्यजितसिंह पाटणकर

loading image
go to top