
ढेबेवाडी (जि.सातारा) : मुंबईतून पत्नीसह गावाकडे आल्यानंतर आपल्या गावी जाण्यापूर्वी सासरवाडीतील प्राथमिक शाळेत एक दिवस मुक्कामी राहिलेल्या जावयाने वाल्मीक पठारावरील दुर्गम तामिने गावच्या जिवाला घोर लावला आहे. काल रात्री या दांपत्याचा रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या तामिन्यातील आठ जणांना तळमावल्याच्या विलगीकरण कक्षात दाखल केले असून, अन्य काही जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउन शिथिल केल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने आपापल्या गावांकडे आले आहेत. वाल्मीक पठारावरील तामिने येथेही 21 तारखेला सकाळी साडेआठ वाजता दहा मुंबईकर नागरिक मोटारीने दाखल झाले. त्यामध्ये तेथून सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या सदुवर्पेवाडी (सळवे, ता. पाटण) येथील एक दांपत्यही होते. तामिनेत सासुरवाडी असल्याने तेथेच क्वारंटाइन होण्याच्या तयारीने जावईबापू आपल्या पत्नीसह त्याच मोटारीतून आले होते. गावातील प्राथमिक शाळेच्या खोल्यात आणि त्यासमोरच घातलेल्या मांडवात तेथील ग्रामपंचायत व दक्षता समितीने मुंबईहून आलेल्या गावकऱ्यांच्या क्वारंटाइनची व्यवस्था केली आहे. त्या दिवशी आलेल्या त्या दहा जणांना ग्रामस्थांनी शाळेत ठेऊन तेथेच त्यांच्या स्वयंपाकाचीही व्यवस्था करून दिली. मात्र, छोट्या शाळेत 33 जण क्वारंटाइनमध्ये असल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी सदुवर्पेवाडीतील दांपत्याने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. दोघा नातेवाइकांना सोबतीला घेऊन ते डोंगरमार्गे सदुवर्पेवाडीत पोचल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी त्यांना अंगणवाडीत क्वारंटाइन केले.
दरम्यानच्या काळात त्यांना पोटदुखी व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांपूर्वी सळवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बने यांनी त्यांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्या घशातील स्रावांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काल रात्री यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, डॉ. राहुल बने यांच्यासह महसूल, पोलिस व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने तेथे दाखल झाले. या दांपत्याने तामिनेच्या शाळेत मुक्काम केल्याने तेथे त्यांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना तळमावल्याच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, अन्य चार जणांना त्रास जाणवत असल्याने कृष्णा रुग्णालयात पाठवल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी या दांपत्याला सदुवर्पेवाडीपर्यंत पोचवायला गेलेले दोघे नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कातील तिघे अशा पाच जणांना होम क्वारंटाइन केल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बने यांनी सांगितले.
ढेबेवाडी भागात वाढतेय रुग्णसंख्या
ढेबेवाडी विभागात कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडण्याची मालिका सुरूच असून, कालरात्रीपासून आणखी आठ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 23 झाली आहे. कालरात्री सदुवर्पेवाडी येथील मुंबईहून आलेल्या दांपत्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सकाळी मान्याचीवाडी व गलमेवाडीतील प्रत्येकी एक, तर धामणीतील चौघांच्या स्वबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरावर आठवड्यापासून असलेले भीतीचे सावट आणखीनच गडद झाले आहे.
सातारा जिल्हा प्रशासनाच्या 'त्या' भुमिकेबाबत नागरिकांमध्ये असंतोष
तुम्ही केस, दाढी, फेशियल करण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचा
पुण्यातील सहायक पोलिस आयुक्तावर भुईंजला खंडणीचा गुन्हा दाखल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.