सूनबाईंमुळे 'या' ग्रामस्थांच्या जिवास घोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

संबंधित बाधित महिलेच्या संपर्कात आलेले या वस्तीवरील सर्व कुटुंबे क्वारंटाइन करून या वस्तीकडे जाणारे सर्व रस्ते तातडीने सील केले. संबंधित महिलेच्या इतर जण संपर्कात येऊन तयार झालेल्या साखळीची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे.
 

म्हसवड : सासऱ्याच्या अंत्यविधीस मुंबईहून आलेली सूनबाई कोरोना बाधित झाल्याने ग्रामस्थांच्या जिवास घोर लावल्याची घटना माण तालुक्‍यातील पाटोळ खडकी येथे घडली.
 
म्हसवडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील पाटोळ खडकी येथील एका 54 वर्षीय महिलेचा (ता. 29) रात्री कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याची माहिती समजताच या गावातील ग्रामस्थांना चांगलीच धडकी भरली. आपल्या गावातील; परंतु ती महिला कोण असावी? या चिंतेतच अनेक कुटुंबांतील ग्रामस्थांनी आख्खी रात्र जागूनच काढली. आज (मंगळवार) सकाळी मात्र ती महिला गावाबाहेरील वस्तीवरील असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांना दिलासा मिळाला खरा; परंतु संबंधित कोरोना बाधित महिला त्यांच्या कुटुंबासोबतच पाहुण्यासह ग्रामस्थांच्याही संपर्कात आल्याचे चौकशीनंतर समोर आल्यामुळे दुपारनंतर पुन्हा या गावातील ग्रामस्थ चिंतेत आहेत.
 
पाटोळ खडकी हे सासर असलेली संबंधित बाधित महिला पतीच्या नोकरीनिमित्त मुंबईस स्थायिक होती. दहा दिवसांपूर्वी त्यांच्या सासऱ्याचे निधन झाल्यामुळे सूनबाई तातडीने मुंबईहून गावी आल्या. अंत्यविधीसही उपस्थित राहिल्या. त्यानंतर सावडणे, दशक्रिया विधीसही त्यांचा सहभाग राहिला. त्यानंतर गावातील एका विवाह कार्यक्रमासही त्यांनी उपस्थिती लावली होती.  गावाबाहेरील ज्या वस्तीवर त्यांचे कुटुंब राहात आहे. त्याच वस्तीवर त्यांच्या दिरांची आणखी पाच कुटुंबे राहात असल्यामुळे या सूनबाईंचा सुमारे शंभराहून अधिक संख्या असलेल्या या सर्व कुटुंबाशी संपर्क आला होता.

सातारा : 'या' तालुक्यांतील काेराेना बाधितांची संख्या पुन्हा वाढली

गेल्या चार दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लक्षणे असलेला त्रास जाणवू लागल्यामुळे तिचा डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह अहवाल आला. आज (मंगळवार) दुपारी पाटोळ खडकी या गावातील वस्तीस प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे आदी अधिकारी समवेत शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी पथकाने भेट दिली. संबंधित बाधित महिलेच्या संपर्कात आलेले या वस्तीवरील सर्व कुटुंबे क्वारंटाइन करून या वस्तीकडे जाणारे सर्व रस्ते तातडीने सील केले. संबंधित महिलेच्या इतर जण संपर्कात येऊन तयार झालेल्या साखळीची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे.

...म्हणून नमाे अ‍ॅपवरही बंदी घाला : पृथ्वीराज चव्हाण

विवाह झाले रद्द ; दुसरा मुहूर्त शोधण्याची लागली घाई का ते वाचा.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Covid 19 positive Patient Found In Mann Taluka