मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उच्चस्तर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 495 कोटी 46 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय उपलब्ध झाला आहे.

मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

सातारा : साताऱ्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने 495 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीस काल (शुक्रवार) प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या निर्धारित जागेवर दोन टप्प्यांत प्रत्यक्ष बांधकाम होणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय व 300 खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम होईल. ते पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 200 खाटांच्या रुग्णालयाचे काम होणार आहे.
 
बारामतीच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या या मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्‍यक होते. सध्या मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले आहे. नव्याने होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली नव्हती. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उच्चस्तर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 495 कोटी 46 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे रुग्णालय इमारत आणि त्या अनुषंगिक बांधकाम केले जाईल. त्यामुळे पुढील वर्षी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रिया आणि 60 एकर जागेत बांधकामाची प्रक्रिया एकाच वेळी सुरू होईल.

शरद पवारांचे आत्मचरित्र हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊंचा खोचक टोला  
 
शिवेंद्रसिंहराजेंकडून पाठपुरावा 

मेडिकल कॉलेजसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई येथे दोन दिवसीय अधिवेशनात शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवार यांची भेट घेऊन वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली होती.

शेट्टी, खोतांना शेतकऱ्यांविषयी काही देणं-घेणं नाही; पंजाबराव पाटलांची टीका

त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 61 कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली होती. दरम्यान, जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे केली होती. त्याला यश मिळाले आहे.

शिवसेनेच्या बड्या नेत्यावर किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, केली ED आणि RBI मार्फत चौकशीची मागणी  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Web Title: Satara Latest Marathi News 495 Crore Fund Sanctioned Satara Medical College

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..