कोरोनाशी लढत लढतच जगायला शिका : रामराजे निंबाळकर

अमोल काकडे 
Saturday, 19 September 2020

फलटण तालुक्‍यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी'या मोहिमेचा प्रारंभ येथे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी रामराजे यांनी लोकसहभागाचा कॉलम सर्वेक्षणात नसेल तर त्याचा एक स्वंतत्र कॉलम तयार करून लोकसहभाग समाविष्ट करावा, अशा सूचनाही गटविकास अधिकारी डॉ. गावडे यांना दिल्या. 

तरडगाव (जि. सातारा) : कोरोना विषाणू व संसर्गाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपण स्वतः आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना विषाणूशी लढत लढतच आपण जगायला शिकले पाहिजे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. 

फलटण तालुक्‍यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी'या मोहिमेचा प्रारंभ येथे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समितीच्या उपसभापती सुरेखा खरात, गटविकास अधिकारी डॉ. अस्मिता गावडे, वसंतकाका, सरपंच, उपसरपंच, विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ""कोरोना विषाणूची भीती सर्वांना लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय करतो अथवा दवाखान्यातून एखादे इंजेक्‍शन घेऊन त्यावर उपचार करून घेतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून आपण कोरोनावर मात करू शकतो.'' 

साधा सर्दी, खोकला, ताप असला तरीसुद्धा कोरोनाची चाचणी करून आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे. आज सर्वांची काळजी घ्यावी. आपली आपण काळजी घेतली तर आपण कोरोनामुक्तीच्या वाटेकडे जाऊ. यासाठी आपल्या गावात प्रशासनाच्या समितीबरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन माहिती संकलित करून, प्रशासनासह मला पाठवावी. लोकसहभागाशिवाय हे अभियान पूर्णत्वास जाणार नाही, असे सांगून रामराजे यांनी लोकसहभागाचा कॉलम सर्वेक्षणात नसेल तर त्याचा एक स्वंतत्र कॉलम तयार करून लोकसहभाग समाविष्ट करावा, अशा सूचनाही गटविकास अधिकारी डॉ. गावडे यांना दिल्या. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

वाईतील रुग्णालयांत 180 कृत्रिम ऑक्‍सिजनसह बेड वाढवणार : प्रांताधिकारी राजापूरकर

जावळीत कोविड सेंटर उभारण्यासाठी मुंबईत बैठक; उद्योजक, कार्यकर्त्यांची उपस्थिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Learn To Live By Fighting With Corona : Ramraje Nimbalkar